|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शुक्रवारची महासभा रद्दसाठी उपमहापौर गट उच्च न्यायालयात

शुक्रवारची महासभा रद्दसाठी उपमहापौर गट उच्च न्यायालयात 

    सांगली :प्रतिनिधी

  राजदंड पळवून गोंधळ घातल्याने रद्द केलेली महासभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. पण महापौर हारूण शिकलगार यांनी शुक्रवारी घेतलेली ही महासभाही  बेकायदेशीर असल्याने ती रद्द करावी, या मागणीसाठी उपमहापौर गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या गटाचे नेते शेखर माने यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मनपाला गुरूवारी म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे ही महासभाही वादाAdd Newत सापडली असून, या महासभेच्या वैधतेवर आज शिक्कामोर्तब होणार आहे.

 शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली महासभा होणार आहे. या सभेची नोटीस उपमहापौर विजय घाडगे व नगरसेवक शेखर माने यांना देण्यात आली नाही. शिवाय महासभेची नोटीस सात दिवस अगोदर द्यावी लागते. मात्र सदस्यांना नोटीस मिळालेली नाही. त्यामुळे मनपा अधिनियमानुसार ही महासभा रद्द करावी, या मागणीची याचिका उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाईक व छाबला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी न्यायमूर्तींनी महापालिकेला म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

 या याचिकेत माने यांनी नगरविकासचे मुख्य सचिव, महापौर हारूण शिकलगार, आयुक्त रवींद्र खेबुडकर आणि नगरसचिवांना पार्टी केले आहे. महापालिकेचे  नगरसचिव कल्लाप्पा हळिंगळे हे बुधवारीच मुंबईला रवाना झाले आहेत.

 गुरूवारी दुपारी महापालिकेच्यावतीने न्यायालयात म्हणणे मांडण्यात येणार आहे. महापालिकेची सप्टेंबर महिन्यात सभा झाली होती. या सभेत उपमहापौर विजय घाडगे व नगरसेवक शेखर माने यांना महापौर हारूण शिकलगार यांनी पंधरा दिवसांसाठी निलंबित केले होते. त्यामुळे शुक्रवारच्या महासभेची नोटीस दोघांना दिली गेली नसल्याचे म्हणणे महापालिकेच्यावतीने मांडण्यात येणार आहे. शेखर माने यांच्यातर्फे ऍड.उमेश मानकापुरे काम पाहत आहेत. त्यामुळे गुरूवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी होणारी महापालिकेची महासभा कायदेशीर की बेकायदेशीर याचा फैसला गुरूवारी मुबंई उच्च न्यायालयात होणार आहे. त्याची महापालिकेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.