|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हय़ातील मध्यम-लघु प्रकल्पात अवघा 25 टक्के पाणीसाठा

जिल्हय़ातील मध्यम-लघु प्रकल्पात अवघा 25 टक्के पाणीसाठा 

प्रतिनिधी/ सांगली

पावसाच्या अवकृपेमुळे जिह्यातील मध्यम व लघु अशा 84 प्रकल्पांमध्ये केवळ 25 टक्के पाणीसाठा झाला आहे. जत, कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील दोड्डनाला, संख, सिध्देवाडी व बस़ाप्पावाडी हे चार मध्यम प्रकल्प अक्षरशः कोरडे ठणठणीत पडले आहेत. कडेगाव तालुक्यातील लघुप्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत, मात्र अन्य तालुक्यातील लघु प्रकल्पामध्ये थेंब पाणी नसल्याने पाणी टंचाईची स्थिती गंभर होण्याची शक्यता आहे.

जिह्यात मध्यम 5 तर लघु 79 असे 84 प्रकल्प आहेत. यंदाच्या पावसाळ्यात शिराळा तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्प सोडला तर अन्य प्रकल्पात एक थेंबही पाणी साठलेले नाही. मध्यम प्रकल्पात केवळ 33 टक्के पाणीसाठा आहे. तोही मृत आहे. उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. लघु प्रकल्पांचीही अशीच अवस्था आहे. 79 लघु प्रकल्पामध्ये नाममात्र 23 टक्के पाणीसाठा आहे. लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठय़ांची सरासरी काढल्यास केवळ 33 टक्के पाणीसाठा 84 मध्यम व लघु प्रकल्पामध्ये आहे. यामुळे भविष्यात   दुष्काळी तालुक्यात पाणी टंचाई गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाळा संपत आला तरी तलावात पाणीसाठा न झाल्याने यापुढे शेतीच्या पाण्याचाही प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे.

गत वर्षीही केवळ 35 टक्के पाणीसाठा

जिह्यात जत तालुक्यात संख व दोड्डनाला, कवठेमहांकाळ तालुक्यात बसाप्पावाडी, तासगाव तालुक्यात सिध्देवाडी तसेच शिराळा तालुक्यात मोरणा असे पाच मध्यम प्रकल्प आहेत. यातील दोड्डनाला, संख, बसाप्पावाडी व सिध्द़ेवाडी हे चार मध्यम प्रकल्प कोरडे ठणठणीत पडले आहेत. गतवर्षीही या प्रकल्पामध्ये केवळ 35 टक्के पाणीसाठा होता.

कडेगावातील लघु प्रकल्प काठोकाठ

कडेगाव तालुक्यातील चिंचणी (अंबक) लघु प्रकल्पात 100 तर हिंगणगाव  कडेगाव, कारंडेवाडी, शाळगाव या तलावामध्ये 40 ते 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. आटपाडी तालुक्यात 13 लघु प्रकल्प आहेत. त्यातील आटपाडी 58, घानंद 100, कचरेवाडी 41 तर महाडिकवाडी लघु प्रकल्पामध्ये 77 टक्के पाणीसाठा आहे. यातील बराचसा पाणीसाठा हा मृत पाणीसाठा आहे. जत तालुक्यात तब्बल 26 लघु प्रकल्प आहेत. यातील केवळ तीनच लघु तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. बिरनाळ, कोसारी तर प्रतापूरच्या लघु प्रकल्पात चांगला पाणीसाठा झाला आहे. कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज तालुक्यातील लघु प्रकल्पामध्येही नाममात्रच पाणीसाठा आहे.