|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पेडणेची पुनव आज

पेडणेची पुनव आज 

प्रतिनिधी/ पेडणे

पेडणे येथील सुप्रसिद्ध कोजागिरी पौर्णिमा म्हणजे पुनव उत्सव गुरुवार दि. 5 रोजी साजरा होणार आहे. संपूर्ण गोव्यातील, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पेडणेची श्री भगवती देवी, श्री देव रवळनाथ व भूतनाथ देवाचा कौल लाखो भाविक या उत्सवादरम्यान घेण्यासाठी पेडणेत येतात.

घटस्थापनेपासून हा उत्सव सुरू होतो. पेडणेचा दसरा म्हणून या उत्सवाचा लौकिक संपूर्ण गोवा राज्यात आहे. श्री भगवती देवीचा अपार महिमा तसेच देव रवळनाथ व देव भूतनाथ देवाचा कौल व पुनवेदिवशी काढण्यात येणारी भूते म्हणून ही पुनव खूपच प्रसिद्ध आहे.

या उत्सवाची जोरदार तयारी झाली असून श्री भगवती मंदिर परिसरात वेगवेगळी दुकाने, फुल विक्रेता, खाजे विकणारे, खेळण्यांची दुकाने आदींनी परिसर फुलून गेला आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देवस्थान समितीचे पदाधिकारी सज्ज झाले असून या उत्सवाचा महिमा खूप मोठा असल्याने पेडणेत उत्साही वातावरण आहे. पेडण्याची पूनव यशस्वीतेसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

‘एका रात्रीत एका वातीत’

पेडण्याच्या पुनवेचे वैशिष्टय़ म्हणजे ‘एका रात्रीत एका वातीत’ मंदिर बांधण्याचे भक्तांनी देवाला दिलेले आश्वासन. रात्री उशिरा हर हर महादेवाच्या गजरात भूतनाथ व रवळनाथाच्या तरंगे पारंपरिक वाटेने डोंगराच्या दिशेने धाव घेण्यास सुरुवात करतात. यावेळी देवाची समजूत काढताना देवाला ‘एका रात्रीत एका वातीत मंदिर’ बांधण्याचे आश्वासन भाविकांतर्फे दिले जाते. या आश्वासनावर पूर्ण भरवसा ठेवून तरंगे पारंपरिक वाटेने निघून रवळनाथ मंदिरात आल्यानंतर त्याठिकाणी विधिवत सांगता होते. हा सोहळा बघण्यासाठी बरीच भाविकांची गर्दी होते.