|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » नादाल -डिमिट्रोव्हमध्ये उपांत्य लढत

नादाल -डिमिट्रोव्हमध्ये उपांत्य लढत 

वृत्तसंस्था/ बिजींग
येथे सुरू असलेल्या चीन खुल्या पुरूषांच्या आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सिडेड टेनिसपटू राफेल नादाल तसेच बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह यानी एकेरीची उपांत्यफेरी गाठली आहे. रशियाच्या रूबलेव्हने झेकच्या बर्डिचला पराभवाचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसने उपांत्यफेरी गाठली आहे. महिला विभागात रूमानियाची हॅलेप तसेच लॅटव्हियाची ओस्टापेंको, झेकची क्विटोव्हा यानी एकेरीत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले.

पुरूष एकेरीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या नादालने अमेरिकेच्या जॉन इस्नेरचा 6 -4, 7-6 (7-0) असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात बल्गेरियाच्या तृतीय मानांकित डिमिट्रोव्हने स्पेनच्या ऍग्युटवर  7-6 (7-5), 4-6, 6-2 अशी मात करत उपांत्यफेरीत स्थान मिळविले. नादाल आणि डिमिट्रोव्ह यांच्यात उपांत्यफेरीचा सामना होईल. ऑस्ट्रेलियाच्या किरगॉईसने शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात किरगॉईसने बेल्जियमच्या डार्सिसवर  6-0, 3-0 अशी मात केली. या सामन्यात डार्सिसने दुखापतीमुळे दुसरा सेट चालू असताना माघार घेतली. रशियाच्या नवोदित रूबलेव्हने झेकच्या बर्डिचला 1-6, 6-4, 6-1 असा पराभवाचा धक्का देत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. रूबलेव्ह आणि किरगॉईस यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. रूबलेव्ह या लढतीत शेवटच्या 13 पैकी 11 गेम्स सलग जिंकून बर्डिचचे आव्हान संपुष्टात आणले.

रूमानियाच्या सिमोना हॅलेपने रशियाच्या बिगर मानांकित डॅरिया कॅसेटिकिनाचा 6-2, 6-1 अशा सरळ सेटसमध्ये 70 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत महिला  विभागात उपांत्यफेरी गाठली. लॅटव्हियाची ओस्टापिंको आणि हॅलेप यांच्यात उपांत्य लढत होईल. क्विटोव्हाने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना झेकच्या स्ट्रायकोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले.