|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एनडीए प्रवेशावर राणेंचे शिक्कामोर्तब

एनडीए प्रवेशावर राणेंचे शिक्कामोर्तब 

प्रतिनिधी/ ओरोस

नव्याने स्थापन करण्यात आलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संयुक्त लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी होणार असल्याचे या पक्षाचे संस्थापक तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. वज्रमुठीतून कोकणच्या थांबलेल्या विकासाला गती देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 काँग्रेसचा हात सोडून बाहेर पडलेल्या राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. या पक्षाने ‘एनडीए’त सहभागी व्हावे, असे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र याबाबतचा निर्णय राणे यांनी राखून ठेवला होता. त्यामुळे राणेंच्या भूमिकेचे औत्सुक्य होते. शुक्रवारी पडवे येथील मेडिकल कॉलेजमध्ये पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी ‘एनडीए’त दाखल होणार असल्याचे जाहीर केले. यापूर्वीची काँग्रेस पक्षाची मात्र सध्या पदमुक्त असलेली कार्यकारिणीच या नव्या पक्षाचा कार्यभार सांभाळणार आहे. त्यात सद्यस्थितीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पक्षाच्या अधिकृत नोंदणीनंतर रितसर कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि. प. अध्यक्ष रेश्मा सावंत, नूतन जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जि. प. उपाध्यक्ष रणजित देसाई, जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, जि. प. माजी अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर, मेघा गांगण, संजू परब आदी उपस्थित होते.

कोकण आणि राज्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याने जनतेचे रेंगाळलेले प्रश्न सोडविण्यासाठीच ‘एनडीए’त सहभागी होण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सद्यस्थितीत मंत्रीपदाबाबत कोणतीच ऑफर नाही वा त्या अनुषंगाने  चर्चाही झालेली नाही. 2019 पर्यंत राज्याच्या राजकारणात थांबणार असल्याचे सांगून केंद्रात जाण्याच्या चर्चेला राणे यांनी पूर्णविराम दिला.

नवीन पक्षाचा झेंडा हा तिरंगी असून त्यावर वज्रमुठीचे चिन्ह अपेक्षित आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षाचा विस्तार केला जाणार आहे, असे नमूद करतानाच  मराठा समाजाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार नीतेश राणे योग्यवेळी स्वाभिमान पक्षात दाखल होतील. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे असंख्य आमदारही येणार आहेत. काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आणि नवीन पक्षाच्या घोषणेनंतर शिवसेनेच्या गोटात घबराट निर्माण झाली आहे, असेही राणे म्हणाले. मात्र शिवसेना हा पक्ष आपला राजकीय शत्रू नसून या पक्षाची विचारसरणी व कार्यपद्धतीला आपला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत त्यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावरच थेट आरोप केले. रस्ता सुस्थितीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल करीत त्यांना जमत नसेल तर त्यांनी काम होत नसल्याचे मान्य करावे. त्यानंतर हे खड्डे आपण आपल्या हिमतीवर बुजवून दाखवतो, असे ते म्हणाले.

पक्ष काढणे सोपे आहे. अनेकजण पक्ष काढतात. तसाच राणेंनीही पक्ष काढला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री असताना त्यांनी जसा कारभार केला तसेच त्यांच हे स्टेटमेन्ट असल्याची उपरोधिक टीका राणे यांनी केली.

‘समर्थ’चे 27 सरपंच बिनविरोध

जिल्हय़ात होत असलेल्या 325 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत समर्थ विकास पॅनेलचे 27 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी पक्षांना एकही सरपंच निवडून आणता आलेला नाही. स्वाभिमान पक्षाला तोलामोलाचा विरोधी पक्षच अस्तित्वात नसल्याचे त्यांनी सांगितले.

अंगणवाडी कर्मचारी संपाला पाठिंबा

अंगणवाडी कर्मचाऱयांच्या संपाला पाठिंबा जाहीर करतानाच मागण्या पदरात पाडून देण्याचे आश्वासन देत राणे यांनी त्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले. राणे यांच्या आदेशानुसार जिजाई अंगणवाडी कर्मचारी संघटनेने या संपातून माघार घेतली असून या संघटनेचे सदस्य कर्मचारी कामावर हजर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

Related posts: