|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भारनियमनाची अंमलबजावणी न केल्यास निलंबन

भारनियमनाची अंमलबजावणी न केल्यास निलंबन 

महावितरणचा फतवा : चौकशीसाठी राज्यस्तरीय पथकाची नियुक्ती

शहाबाज शेख / सोलापूर

ठरवून दिलेल्या काळात भारनियमनाची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही याची चौकशी करण्याकरीता माहावितरणने स्वतंत्र विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. पथकाला भारनियमनाकडे कानाडोळा करणाऱया अधिकारी अथवा कर्मचाऱयांना थेट निलंबन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांतून खळबळ माजली आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यात विजेच्या भारनियमनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोळशाची कमतरता असल्यामुळे राज्यात दोन हजार मेगावॅटची तुटवडा निर्माण झाल्याने भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगताना दिवाळीपूर्वी सदरचे भारनियमन रद्द करून पुर्णवेळ वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. पण, दुसरीकडे भारनियमनाची काटेकोर अंमलबजवणी करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्त करून महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांना चांगलाच दणका दिला आहे.

सोलापूर जिल्हय़ाचा विचार केल्यास जिल्हय़ात साडेतीन तास ते 14 तासापर्यत भारनियमन आहे. शहरीभागात भारनियमन होणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी सद्यस्थितीला आठ तासाचे भारनियमन सुरू आहे. तर ग्रामीण भागात हेच भारनियमन 14 तासावर पोहोचले आहे. भारनियमनामुळे शहरीभागातील नागरीकांच्यासह ग्रामीण भागातील शेतकऱयांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेसह राजकीय आणि सामाजिक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार हातात घेतले आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांना नागरीकांच्या आणि शेतकऱयांच्या रोशास सामोरे जावे लागत आहे.

महावितरणने भारनियमनाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरीय विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. तसे परिपत्रकही काढले आहे. भारनियमनाचे वेळापत्रकानुसार हे पथक ज्या त्या भागाला अचानक भेटी देऊन तेथील भारनियमनाची चौकशी करणार आहे. जर भारनियमनाच्या काळात वीज पुरवठा सुरू राहिल्याचे आढळून आल्यास संबंधित विभागाच्या अधिकारी अथवा कर्मचाऱयास थेट निलंबीत करण्याचे अधिकार देण्यात आल्याचे परिपत्रकात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांकडुन भारनियमनाला अधिक महत्व देण्यात येत आहे.