|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अन्यथा सोयाबीन व्यापाऱयांवर गुन्हे दाखल करावेत : सदाभाऊ खोत

अन्यथा सोयाबीन व्यापाऱयांवर गुन्हे दाखल करावेत : सदाभाऊ खोत 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

सोयाबीनची खरेदी किमान आधारभूत दर 3050 रुपयांनी करण्यात यावी. त्या किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाऱया व्यापाऱयांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच तालुक्यातील सर्व खरेदी केंद सुरु ठेवण्यात यावेत, अन्यथा त्यांचे परवाने रद्द करावेत, असे आदेश कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. 

प्रकाश हॉस्पिटलच्या सभागृहात शनिवारी बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, मार्केटींग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी दानोळी, जिल्हा पणन व्यवस्थापक तानाजी नांगरे, सहाय्यक निबंधक अमोल डफळे, बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, उपसभापती सुरेश गावडे, सचिव विजयकुमार जाधव, विजय पवार, भास्कर कदम, जयराज पाटील यांच्यासह वाळवा शिराळा तालुक्यातील प्रमुख व्यापारी उपस्थित होते.

आढावा घेताना खोत पुढे म्हणाले, नाफेड मार्फत शासनाच्या किमान आधारभूत किमतीने सोयाबीनची खरेदी झाली पाहिजे. वजन काटे, मॉइश्चर, मीटर प्रमाणीत असणे आवश्यक आहे. किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने सोयाबिन खरेदी करणाऱया व्यापाऱयावर गुन्हे दाखल करावेत. बाजार समितीच्या आवारा बाहेरील सेस वसुली थांबवावी. यार्डातील ज्या भूखंडावर शेतीमाल व्यवसाय होत नाही. अशांवर बाजार समितीने नोटीस देवून कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना ही त्यांनी केल्या.

दरम्यान, मार्केटयार्ड परिसरात स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नगर पालिकेने करावी तर झोपडपट्टी बाबत सहाय्यक निबंधकांनी अहवाल सादर करावा, यांवर चर्चा झाली. यावेळी तानाजी मस्के, उल्हास शहा, संजय बिंदगे, विजय सुहासे यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.

किमान आधारभूत खरेदी केंद्र

बाजार समिती आवारात सोयाबीन खरेदीसाठी आधारभूत केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्याच्या नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या सेंटरवर नोंदणी करताना शेतकऱयांनी सातबारा, आधारकार्ड, बँक पासबूक देणे आवश्यक आहे.