|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » चिपळूणच्या सुपुत्राने ‘अंदमान’मध्ये शोधल्या मुंग्यांच्या दोन नव्या प्रजाती

चिपळूणच्या सुपुत्राने ‘अंदमान’मध्ये शोधल्या मुंग्यांच्या दोन नव्या प्रजाती 

राजेंद्र शिंदे / चिपळूण

  अंदमानमधील हॅवेलॉक बेटावर सदाहरीत जंगलात संशोधन करून चिपळूणच्या गौरव आगवेकर या सुपुत्राने मुंग्यांच्या दोन नवीन प्रजाती शोधून काढल्या आहेत. बेंगलोरच्या एनसीबीएस म्हणजेच राष्ट्रीय सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचा विद्यार्थी असलेल्या गौरवने क्ष-किरण तंत्रज्ञानाचा वापर करत शोधलेल्या सूक्ष्म अशा टेट्रामोरियम कृष्णानी आणि जारवा या दोन नवीन प्रजाती आतापर्यंत जगात अस्तित्वात असलेल्या सहाशे प्रजातीमध्ये भर टाकणार आहेत. गौरवचा शास्त्रीय प्रबंध ‘पीआरजे’ जर्नलवर प्रसिध्द झाला आहे. गौरवच्या या गौरवशाली संशोधनाने चिपळुणवासियांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

   शहरातील पाग येथे राहणाऱया गौरवने बारावीपर्यंत शिक्षण येथील डी.बी.जे महाविद्यालयात घेतल्यानंतर पुढील शिक्षण त्याने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजला पूर्ण केले. त्यानंतर त्याने बेंगलोर येथील भारत सरकारच्या अखत्यारीत असलेल्या बेंगलोर येथील राष्ट्रीय सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सचा संस्थेत प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमासाठी दर दोन वर्षांनी केवळ देशातील पंधरा विद्यार्थी निवडून प्रवेश दिला जातो. या संस्थेत अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सध्यस्थितीत तो या संस्थेत डॉ. दीपा आगाशे यांच्या प्रयोगशाळेत ज्gयनियर रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहे.

  गौरवला शालेय जीवनापासूनच पक्षीवैभव आणि त्यामागचे संशोधन याबाबतची आवड होती. त्यातूनच त्याने पुणे येथील महाविद्यालयीन शिक्षणानंतर बेंगलोर येथे प्रवेश घेतला. मुंग्या आकाराने लहान असल्या तरी त्यांचा पर्यावरणावर प्रचंड परिणाम असतो. त्यांचा आकार लहान असला तरी त्यांची समूहात संख्या हजारोने असते. यामुळे सर्वसाधारणपणे बायोमास जास्त असतो. वसाहतीने मुंग्याची संख्या अधिक असली तरी त्यामध्ये एकच राणी मादी अंडी देऊ शकते. गौरवने एमएससी थेसीससाठी मुंग्यांच्या वसाहतीचा अभ्यास करायचा ठरवला. यासाठी त्याने  हॅवेलॉक  बेट निवडले. कारण तिथे एकाच बेटावर दोन वेगळय़ाप्रकारची जंगल उपलब्धता आहे. त्यामध्ये मातीचा प्रकार व झाडांच्या तीव्रतेत फरक आहे. या नव्या मुंग्यांचे वर्णन करण्यासाठी त्याने पारंपरिक पद्धतीशिवाय एक्सरे किरणांचा आधार घेतला. एक्स्प्रे मायक्रो ट्रोमोग्राफी तंत्रज्ञान सिटी स्कॅनसारखीच असते. मात्र याचा वापर करून सूक्ष्म कीटकांचे स्कॅन करता येते. हे स्कॅन वापरून मुंग्यांचा सखोल अभ्यास करता येणे शक्य होते. गौरवने ते करून दाखवले.

  गौरवने आपल्या अन्य सहकाऱयांसमवेत तीन महिने या बेटावर वास्तव्य केले. तेथे गेल्यावर त्याने प्रथम तेथील पालापाचोळा, वृक्ष यांचा अभ्यास केला. जमिनीत  उत्खनन करत त्याने पालापाचोळा गोळा करून त्यातून शेकडो नमुने गोळा केले. त्यामध्ये साधारणपणे अवघ्या 2 ते 3 मि. मी. आकाराच्या मुग्यांच्या दोन नव्या प्रजातीचा शोध लागला. यासाठी उपलब्ध वेगवेगळय़ा पुस्तकांचा आधार घेत त्यातून अधिकाअधिक माहिती मिळवली. सूक्ष्म अशा नव्या प्रजाती शोधून काढणे तसे अवघड काम आहे.

  आजपर्यंत भारतात वाघ किंवा हत्ती अशा मोठय़ा प्राण्यांवर भरपूर संशोधन झाले असले तरी कीटकांमध्ये भारतात फुलपाखरांचा अभ्यास चांगला झालेला आहे. मात्र मुंग्यांबाबतचा अभ्यास फारच कमी आहे. भारतातील टेट्रामोरियम प्रजातींचा गौरवने रिव्हय़ू केला. त्यानंतर त्यांची आयडेफिकेशन थीम वापरून त्यांना त्याची ओळख दिली. बेंगलोरच्या एमएस्सी इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी ऑफ कॉन्झर्वेशन या अभ्यासक्रमासाठी प्रा. के. एस. कृष्णन यांचे योगदान मोठे असल्याने गौरवने त्यातील एका प्रजातीला टेट्रामोरियम क्रिश्नानी असे नाव दिले, तर दुसऱया प्रजातीला ‘जरावा’ असे नाव दिले. या बेटावर जरावा ही जमात गेल्या क्रित्येक वर्षापासून रहात आहे. त्यांचा जगाशी फारसा संबंध येत नाही. पूर्णपणे दुर्लक्षित असलेल्या या जमातीला यानिमित्ताने जगासमोर आणण्याच्यादृष्टीने गौरवने मुंग्यांच्या या प्रजातीला या जमातीचे नाव दिले आहे.   

  दरम्यान, आपल्या संशोधनावर गौरव पूर्णपणे समाधानी आहे. याबाबतचा आपला अभ्यास पुढे सुरूच राहणार आहे. आपल्याला या संशोधनासाठी एनसीबीएसमधील डॉ. दीपा आगाशे आणि जपानमधील डॉ. इव्हान ईकोनोमो यांचे सहकार्य लाभले. अंदमानमधील शोधकार्यात एकूण 50 जातीच्या मुंग्या आढळल्या. त्यामध्ये काहींची प्रथमच नोंद झाली आहे. यानिमित्ताने अभ्यासामध्ये डझनभर नव्या प्रजातीची भर पडणार असल्याचे गौरवने ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले

Related posts: