|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » महिलेचा अपमान करणाऱया सीईओंना निलंबित करा

महिलेचा अपमान करणाऱया सीईओंना निलंबित करा 

सोलापूर /वार्ताहर

सांगोला येथील चिकमहूद गावात उघडय़ावर शौचास बसलेल्या महिलेला फुलांचा हार घालून फोटोसेशन करणाऱया जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. महिलेचा अपमान करणाऱया जिल्हा परिषदेचे सीईओना निलंबित करा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले. आंदोलन करणाऱया यावेळी पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली.

सांगोला येथील चिकमहूद गावात सीईओ हगणदारी मुक्त गाव संदर्भात  दौऱयावर गेले होते. यावेळी त्यांनी गावातील एक महिला उघडय़ावर शौचास बसून आल्यानंतर त्या महिलेस पुष्पहार घालून त्या महिलेचा अपमान करणाऱया सीईओंच्या निषेधार्थ आज सोमवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने  एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

सोमवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने अचानकपणे आंदोलन केल्यामुळे मोठय़ा प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त होता. दुपारी एकच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेविका, कार्यकर्त्या एकत्रित आल्या आणि गेटवर एकच घोषणाबाजी सुरू झाली. सीईओंचा धिक्कार असो, धिक्कार असो, महिलेचा अपमान करणाऱया सीईओ राजेंद्र भारूड यांना निलंबित करा, सीईओंनी महिलेची माफी मागितलीच पाहिजे, अशा विविध घोषणा देवून राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या महिलांनी आपला राग व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलन करताना महिलांचा आक्रोश पाहून महिला  पोलीस मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्या. तरी महिलांची घोषणबाजी सुरूच होती. सीईओ बाहेर आलेच पाहिजे, अशा घोषणाही महिलांनी दिल्या. तब्बल 20 ते 25 मिनिटानंतर केवळ पाच महिलांना सीईओच्या केबीनमध्ये सोडण्यात आले. त्याठिकाणी महिलांनी सीईओ राजेंद्र भारूड यांना जाब विचारून आपला राग व्यक्त केला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिलेस उद्देशून भारुड म्हणाले, ती महिला माझ्या मातेसमान आहे. मी त्या महिलेस हार घातलेला नाही. विनाकारण पत्रकारांनी माझ्याविरुध्द बातमी लिहून माझा अपमान केलेला आहे. मी त्या महिलेस हार घातलेला फोटो दाखवा तर मी राजीनामा देईन, असे भारूड म्हणाले. महिलांचा आवाज व गोंधळ पाहून डॉ. भारूड यांनी पोलिसांना सांगून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्या व पदाधिकारी यांना हकलायला लावले. भारूड यांनी माफी न मागितल्यामुळे शेवटी राष्ट्रवादीच्या महिलांनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. त्याठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट लावण्यात आले. याठिकाणी पोलिसांशी बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी काही महिलांना धक्काबुक्की केल्यामुळे तेथील वातावरण अधिकच चिघळले होते. त्याठिकाणी पाच महिलांना सोडण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंदा काळे यांनी पूर्ण हकीकत सांगितली. आणि सीईओ राजेंद्र भारूड यांनी महिलेची माफी मागावी अन्यथा त्यांना निलंबित करावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

हे आंदोलन  मंदा काळे व जिल्हा निरीक्षक निर्मला बावीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी नगरसेविका सुनिता रोटे, कार्याध्यक्षा मनिषा नलावडे, लता ढेरे,वैशाली गुंड, यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठय़ा संख्येने होते.

Related posts: