|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विजयसिंह पटवर्धन यांच्यावर फौजदारीचा निर्णय

विजयसिंह पटवर्धन यांच्यावर फौजदारीचा निर्णय 

प्रतिनिधी/ सांगली

माळबंगला जागा विक्री प्रकरणात मनपाची कोटय़वधी रूपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सांगलीचे भूतपूर्व संस्थानिक विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यावर फौजदारी करण्याचे आदेश महापौरांनी सोमवारी महासभेत दिले. तर 25 लाखांच्या वरती रक्कम देण्याचा अधिकार नसताना सात कोटींवर रकमेचा धनादेश दिल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय देगावकर यांच्यावरही कारवाई करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दरम्यान, माळबंगला जागा व्यवहाराच्या चौकशीसाठी उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षेतखाली समितीची नियुक्त करण्यात आली असून महिन्याच्या आत अहवाल देण्याचा आदेश समितीला यावेळी देण्यात आला.

माळबंगला येथील तीन हेक्टर 85 आर ही जागा महापालिकेची असताना या जागेची मनपालाच सात कोटीला विक्री करून मनपाच्या तिजोरीवर दरोडा टाकल्याची तक्रार संतोष पाटील व शेडजी मोहिते यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या चौकशीचा अहवाल दि. सहा ऑक्टोबरच्या महासभेत सादर करण्याचा आदेश महापौरांनी दिला होता. मात्र अपूर्ण असल्याने अहवाल सादर झाला नव्हता. यावरून सदस्यांनी नगररचना अधिकारी व प्रशासनाला धारेवर धरले होते. यावरून सभा तहकूब केली होती.

सोमवारी महापौर हारूण शिकलगार यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली.  सभेत पुन्हा संतोष पाटील यांनी माळबंगला चौकशी अहवाल सादर करण्याची मागणी केली. यावेळी नगररचना विभागाचे अधिकारी पेंडसे यांनी याबाबत सभागृहात प्राथमिक अहवाल सादर केला. सिटी सर्व्हेला तीन हेक्टर 60 आर क्षेत्र असल्याचे स्पष्ट होते. तर जुन्या रेकॉर्डमध्ये तीन हेक्टर 85 आर इतके क्षेत्र असून मोजणीमध्ये क्षेत्र नमुद नसल्याचे त्यांनी सांगितले. या क्षेत्रातील काही भागावर अतिक्रमण झाल्याचे सांगितले. पेंडसे यांच्या खुलाशानंतर संतोष पाटील म्हणाले, 1987 ला तीन हेक्टर 85 आर इतकी जागा एमजीपीकडून तत्कालीन नगरपालिकेला मिळाली होती. या जागेचा उतारा मनपाच्या नावाने निघतो म्हणजेच मनपाचीच जागा मनपाला विकून सात कोटीचा दरोडा टाकला आहे. याशिवाय यातील काही जागेवर अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढून जागा ताब्यात घ्यावी, महापालिकेची जागा महापालिकेलाच जागा विकून फसवणूक केल्याप्रकरणी विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यावर फौजदारीची नोटीस करावी, याप्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच 25 लाखाच्या व्यवहार करण्याचा अधिकार नसताना तत्कालीन आयुक्तांनी सात कोटीवर रक्कम कशी दिली. मनपाच्या तिजोरीवर संगनमाताने टाकलेला दरोडा असून याप्रकरणी त्यांच्यावरही फौजदारी करावी अशी मागणी केली. संतोष पाटील यांच्या भूमिकेला. विवेक कांबळे, शेडजी मोहिते, विष्णू माने, संजय बजाज, प्रशांत मजलेकर आदी सदस्यांनी पाठिंबा देत विजयसिंहराजे पटवर्धन आणि तत्कालीन आयुक्तांवर फौजदारी करण्याची मागणी केली.

माळबंगला जागेच्या प्रश्नावरून सदस्यांच्या आक्रमक भूमिकेचा विचार करून महापौर हारूण शिकलगार यांनी निर्णय देताना 1987 सालात एमजीपीकडून तत्कालीन नगरपालिकेला तीन एकर 85 आर इतकी जागा मिळाली. ती जागा मनपासह इतर बाजूच्या लोकांना विक्री करून मनपाची फसवणूक केल्याचे प्राथमिक अहवालात दिसून येत आहे. यामुळे याप्रकरणी विजयसिंहराजे पटवर्धन यांच्यावर फौजदारी करण्याचे तसेच 25 लाखाच्या वरती व्यवहाराचे अधिकारी नसताना तसेच यासाठी कुठेही प्राधिकृत केले नसताना जादा रकमेचा धनादेश दिल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त संजय देगावकर यांच्यावर फौजदारीची शिफारस शासनाकडे करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचा आदेश दिला. याशिवाय यासाठीच्या चौकशीसाठी उपायुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखालील एक शासकीय चौकशी समिती नियुक्त करून महिन्याच्या आत समितीला अहवाल देण्याचाही आदेश यावेळी त्यांनी दिला.

यावेळी बोलताना संजय बजाज म्हणाले, जागा मनपाची, त्यावर बांधकाम परवाने मनपानेच दिले आहेत. मनपाचीच जागा आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित अधिकारी व जागा विकणाऱयांवर फौजदारी करता येते. विष्णू माने म्हणाले हा मनपावर टाकलेला दरोडा असून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी करावी. तसेच बेकायदेशीरपणे पैसे दिल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्तांवरही कारवाई करून वसुली करावी. हा गंभीर प्राड असून राजाला एक आणि सामान्यांना  वेगळा न्याय नको. विवेक कांबळे म्हणाले, माळबंगला जागा मनपाची, त्यात जे बांधकाम झाले ते अनाधिकृत आहे. तात्काळ काढून टाकावे, तसेच जागा ताब्यात घ्यावी, शिवाय मनपाची फसवणूक केलेल्यांवर कारवाई करावी. प्रशांत मजलेकर म्हणाले, तत्कालीन आयुक्तांनी चुकीच्या पध्दतीने अधिकार नसताना कोटय़वधी रूपये दिले असून याबाबत कारवाईचा निर्णय घ्यावा. शेडजी मोहिते म्हणाले, मनपाची जागा मनपाला विकून कोटयवधी रूपये हडपले आहेत. सात कोटीची फसवणूक झाली असून संबधितांवर फौजदारी करावी.

 गौतम पवार म्हणाले, गणपती मंदिराची प्रॉपर्टी सोडली तर त्यांचे बाकी काही नाही, शहराच्या मध्यभागी जिल्हाधिकारी बंगल्यासमोर दोन एकर जागा असल्याचा दावा राजेंनी केला आहे. सांगलीवाडी आणि सांगलीचा ट्रस्ट केला असून येथील सर्व जागा आमच्या असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे मनपाने माळबंगला जागा एकच ताब्यात घेण्यापेक्षा सर्व जागाबाबत निर्णय झाला पाहिजे. एकाला एक आणि दुसऱयाला एक असा नियम नको. माजी नगरसेवकच्या पुत्राच्या नावे सव्वाकोटी दिले. हा पण विषय घ्या, जनता बजारची जागा ताब्यात घ्या, एसएफसी मेगा मॉलच्या पार्किंग जागांबाबतही निर्णय झाला पाहिजे.