|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जीसीए पदाधिकाऱयांना अपात्र ठरविण्याची मागणी

जीसीए पदाधिकाऱयांना अपात्र ठरविण्याची मागणी 

प्रतिनिधी/ पणजी

गोवा क्रिकेट असोसिएशनची 10 सप्टेंबर रोजी झालेली आमसभा ही लोढा समितीच्या शिफारशीनुसार झालेली नाही. त्यामुळे जीसीए पदाधिकारी पदे भूषविण्यास अपात्र असल्याचा दावा जीसीएचे माजी सचिव व आजीव सदस्य शिरीष नाईक व आजीव सदस्य अरुण नाईक यांनी केला आहे. त्याचबरोबर त्याबाबतचे पत्र भारतीय क्रिकेट नियामल मंडळाला लिहिले आहे.

लोढा समितीने ज्या शिफारशी केल्या आहेत, त्या शिफारशीना पदाधिकारी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे जीसीए प्रशासनाचा ताबा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घ्यावा व नवीन घटना तयार होईपर्यंत हा ताबा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे रहावा असेही पत्रात म्हटले आहे. 10 सप्टेंबर रोजी नोंदणीकृत क्लबची घेतलेली आमसभा बेकायदेशीर असल्याचा दावा शिरीष नाईक यांनी केला आहे. या पत्रात नाईक यांनी चार मागण्या केल्या आहेत. विद्यमान जीसीए पदाधिकारी पदे भूषविण्यात अपात्र असल्याने त्यांना हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर जीसीए प्रशासनाचा ताबा नवीन घटना तयार होईपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे पदाधिकारी राहुल जुरी यांच्याकडे द्यावा अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर जीसीएची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षक नियुक्त करून त्याच्या देखरेखीखाली व्हावी असेही पत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर निधी वाटपातील दुरुपयोग टाळण्यात यावा असेही म्हटले आहे. लोढा समितीने केलेल्या शिफारशींचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्याचबरोबर न्यायालयाने केलेल्या सूचनांचे पालन गोवा क्रिकेट संघटनेने करावे, असेही शिरीष नाईक यांनी म्हटले आहे.

Related posts: