|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » वीजखरेदीचा ग्राहकांवर बोजा?

वीजखरेदीचा ग्राहकांवर बोजा? 

भारनियमन टाळण्यासाठी 200 कोटींची वीज खरेदी

इंधन आकारातून वसुली होणार

मुंबई / प्रतिनिधी

कोळशाच्या पुरवठय़ाअभावी निर्माण झालेल्या वीज भारनियमनाच्या संकटावर मात करण्यासाठी महावितरण कंपनीने खुल्या बाजारातून रोज 1 हजार 470 मेगावॅट विजेची खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. ही वीज खरेदी महिनाभर चालणार असून, त्यासाठी महावितरणला अंदाजे 200 कोटी रूपये मोजावे लागणार आहेत. अर्थात या वीजखरेदीचा बोजा अंतिमत: ग्राहकांवर पडण्याची शक्यता आहे.

महावितरणने खुल्या बाजारातून 1 हजार 470 मेगावॅट वीजखरेदी सुरू केली आहे. साधारणत: प्रती युनिट 3 रूपये 51 पैसे ते 5 रूपये असा या विजेचा दर आहे. बाहेरून वीजखरेदी केल्यामुळे ग्राहकांच्या इंधन आकारात वाढ होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात निवडक पत्रकारांशी बोलताना दिली.

राज्यातील औष्णिक ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा होत नसल्याने राज्यात गेले काही दिवस वीज भारनियमन सुरू होते. हे भारनियमन टाळण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला खुल्या बाजारातून वीजखरेदी करण्यास परवानगी दिली. त्यानुसार ऑनलाईन करार करून विविध खासगी कंपन्यांकडून महिनाभर वीजखरेदी केली जाणार आहे. त्यामुळे दिवाळीत आणि दिवाळीनंतरही राज्यात भारनियमनाची समस्या राहणार नाही, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. राज्याला लवकरच कोळशाचा पुरवठा पूर्ववत होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या पावसामुळे विजेच्या मागणीत घट झाली. आज राज्यात 14 हजार 700 मेगावॅट विजेची मागणी होती आणि तेवढी वीज उपलब्ध करून देण्यात आली. सध्या महावितरणकडून 4 हजार 600 मेगावॅट, अदानीकडून 2 हजार 200, रतन इंडियाकडून 500 मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पातून 3 हजार 900, जेएसडब्ल्यूकडून 560 मेगावॅट, सीजीपीएलकडून 560, एम्कोकडून 85, पवन ऊर्जेतून 200 मेगावॅट, उरण प्रकल्पातून 270 तर जलविद्युत प्रकल्पातून 100 मेगावॅट वीज उपलब्ध असल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली.

वीजखरेदी

1 हजार 470 मेगावॅट विजेसाठी अल्पकालीन करार

पॉवर एक्सचेंजमधून 600 मेगावॅटची वीजखरेदी

एकूण 2 हजार मेगावॅटच्या खरेदीमुळे भारनियमन टळले

Related posts: