|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कोस्टल नकाशे, सीव्हीसीए क्षेत्र निश्चितीबाबत 83 हरकती

कोस्टल नकाशे, सीव्हीसीए क्षेत्र निश्चितीबाबत 83 हरकती 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील कोस्टल प्रारुप नकाशे व सीव्हीसीए क्षेत्र निश्चितीबाबत जिल्हाभरातून एकूण 83 हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त हरकतींवर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बुधवारी सुनावणी घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकूण घेतले. त्यानंतर आता प्राप्त तक्रारींची पडताळणी करून राज्य व केंद्र शासनाला अहवाल पाठविण्यात येणार आहे.

 सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या किनारपट्टी भागात कोस्टल प्रारुप नकाशे व सीव्हीसीए क्षेत्र निश्चितीबाबत जिल्हा प्रशासनामार्फत प्रारुप अधिसूचना 22 ऑगस्ट  रोजी प्रसिद्ध करण्यात आली व 5 ऑक्टोबरपर्यंत 45 दिवसांत हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्हाभरातून एकूण 83 हरकती प्राप्त झाल्या होत्या. हरकती नोंदवणाऱया सर्वांना बुधवारी बोलावून जिल्हाधिकाऱयांनी सुनावणी घेतली. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, केरळचे शास्त्रज्ञ एस. रामचंद्रन, त्यांचे सहकारी रमेशन सुनावणी घेण्यासाठी उपस्थित होते.

आमदार वैभव नाईक, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळकर व नगरसेवक यांच्यासह काही ग्रामपंचायती व नागरिकांनी हरकती नोंदवल्या. या हरकतींमध्ये प्रामुख्याने सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने कोस्टल झोन क्षेत्रामध्ये बांधकाम करण्यासाठी नियमात शिथिलता आणून परवानग्या द्याव्यात, ग्रामपंचायतींना सीआरझेड-3 मधून सीआरझेड-2 (शहरी भागामध्ये) मध्ये टाकावे, कांदळवन चुकीच्या क्षेत्रामध्ये दाखविण्यात आले आहे. अशा प्रकारच्या हरकती नोंदविण्यात आल्या. काहीजणांनी आवश्यक ते पुरावेही सादर केले आहेत.

कोस्टल प्रारुप नकाशे व सीव्हीसीए म्हणजेच संवेदनशील किनारा क्षेत्र निश्चितीबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सुनावणी पूर्ण करून घेतल्यानंतर आता प्राप्त तक्रारींबाबत पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर राज्य व केंद्र शासनाला त्याचा अहवाल पाठवला जाणार आहे. त्यानंतरच कोस्टल प्रारुप नकाशे व सीव्हीसीए क्षेत्र निश्चिती होणार आहे.

Related posts: