|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अंगणवाडी कर्मचाऱयांच्या स्थानिक स्तरावरील मागण्यांची पूर्तता

अंगणवाडी कर्मचाऱयांच्या स्थानिक स्तरावरील मागण्यांची पूर्तता 

आमदार उदय सामंत यांनी केली प्रशासनाशी चर्चा

रत्नागिरी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱयांना ‘दिवाळी भेट’

प्रतिनिधी /रत्नागिरी

जिल्हय़ातील अंगणवाडीसेविका व मदतनीस कर्मचाऱयांच्या राज्यस्तरावरील मागण्यांचा प्रश्नाचा तिढा कायम असताना स्थानिक स्तरावरील प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या 70 टक्के मागण्यांचा आमदार उदय सामंत यांनी सोक्षमोक्ष लावला आहे. त्याचवेळी प्रलंबित मागण्यांसाठी सलग 30 दिवस संपाच्या माध्यमातून यशस्वी लढय़ात सहभागी असलेल्या रत्नागिरी तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱयांना यावेळी ‘दिवाळी भेट’ देणार असल्याचे आमदार सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अंगणवाडीसेविका व मदतनीस कर्मचाऱयांनी प्रलंबित मागण्यांसाठी गेले महिनाभर बेमुदत संप पुकारला होता. राज्यस्तरावर सुरू असलेल्या या कर्मचाऱयांच्या संपादरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चाही काढण्यात आला. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे त्या ठिकाणी थेट पाठिंबा देण्यासाठी हजर राहिले होते. शासनाने मार्च 2018 पासून या कर्मचाऱयांना 5 टक्के पगारवाढ देण्याचे जाहीर केले. पण मानधनवाढ झाली म्हणजे प्रश्न सुटला नसल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले. आजही या कर्मचाऱयांवर इतर उपक्रमांची वाढीव जबाबदारी टाकली जात असल्याचे म्हणणे आहे.

त्या अनुषंगाने आमदार उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेत संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱयांसमवेत बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी अधिकारी त्यामध्ये या कर्मचाऱयांमध्ये अनेकजणी 10 वी नापास देखील आहेत. त्यांना आरोग्य उपक्रमांदरम्यान औषध देण्याची जबाबदारी सोपवली जाते. पण हे काम यापुढे आरोग्य विभागाच्या एएनएम, जीएनएम यांनीच करावे, अशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱयांकडे गेल्या 2 वर्षांपासून प्रथमोपचार किट देण्यात आलेली नव्हती. पण येत्या आठ दिवसात प्राथमिक आरोग्य स्तरावर हे किट देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱयांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी शासकीय मानधन आहे. पण त्या ठिकाणी गेल्यावर पैसे स्वीकारले जातात. त्यासाठी मोफत उपचार सुविधा मिळावी, अशाही सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. शासकीय परिपत्रकाबाहेरही या अंगणवाडी कर्मचाऱयांना कामे करण्यासाठी गोवले जाते. मात्र परिपत्रकानुसारच यापुढे काम करावे, अशाही सूचना अंगणवाडी कर्मचारी महिला संघटनेला देण्यात आल्या आहेत. लाईन लिस्टींगचे काम यापुढे अंगणवाडी सुपवायझर करणार असल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले. सुट्टय़ांच्या दिवशी अंगणवाडी सकाळी 8 ते 11 या वेळेत येत्या आठ दिवसात कार्यवाही केली जाणार आहे. यावेळी लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अंगणवाडी कर्मचाऱयांचे येत्या दिवाळीपूर्वीच मानधनाचे पैसे जमा करण्याच्या सूचना आमदार सामंत यांनी दिल्या आहेत.

या बैठकीला आमदार सामंत यांच्यासमेवत जि. प. अध्यक्ष स्नेहा सावंत, उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, जि. प. गटनेते उदय बने, सदस्य परशुराम कदम, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सीद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये, तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, एकात्मिक बालविकास अधिकारी आरगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कांबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी गावखडकर, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, पुरवठा अधिकारी हातीसकर, अंगणवाडी कर्मचारी संघटना अध्यक्ष आंबेकर, नाखवा यांसह अन्य पदाधिकारी तसेच पं. स. सदस्य उत्तम सावंत, युवासेना तालुकाप्रमुख तुषार साळवी, विभागप्रमुख तात्या सावंत उपस्थित होते.

पोषण आहाराबाबत करणार आयुक्तांशी चर्चा

अंगणवाडीतील मुलांना पोषण आहारासाठी केंद्र शासन 2-3 रुपये धान्य खरेदीसाठी देते. मात्र धान्य दुकानांवर अंगणवाडी कर्मचाऱयांना 7 रु. दराने धान्य दिले जाते. त्यामुळे या कर्मचाऱयांना नाहक भूर्दंड पडतो. तसेच स्टेशनरीसाठीच्या पैशासाठीही तिष्ठत बसण्याची वेळ येते. या संदर्भात शासनाकडे महिला बालकल्याण विभागाच्या आयुक्तांकडे चर्चा करणार असल्याचे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.

Related posts: