|Sunday, July 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणात गुटखा कारखान्यावर छापा

चिपळुणात गुटखा कारखान्यावर छापा 

17 लाखाचा मुद्देमाल जप्त,

कालुस्ते-खुर्द येथील घटना,

गुजरातचा एक अटकेत,

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा,

स्थानिक पोलिसांची संयुक्त कारवाई,

पुढील तपास अन्न, औषध प्रशासन करणार

प्रतिनिधी /चिपळूण

कालुस्ते-खुर्द जांभूळकोंडा येथे गेल्या वर्षभरापासून बेकायदा सुरू असलेल्या गुटख्याच्या कारखान्यावर बुधवारी मध्यरात्री 1.45 वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, स्थानिक पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा मारून गुजरात येथील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सर्वत्र गुटखा विक्री बंद असतानाच चक्क गुटखा बनवण्याचा कारखानाच येथे सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मोहसीन मोहमद हनीफ मेमन (32, मूळगाव-गुजरात, सध्या- पेठमाप) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मेमन हा श्रीमती हसिना कुपे यांच्या मालकीच्या घरामध्ये गुटख्याची निर्मिती करत असल्याची माहिती येथील पोलिसांना मिळाली होती. ही कारवाई मोठी असल्याने त्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला देण्यात आली. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासणे यांनी पथक तयार केले होते.

त्यानुसार सासणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. जगताप, निरीक्षक श. पा. यादव यांच्या मदतीने कुपे यांच्या घरावर बुधवारी मध्यरात्री 1.45 वाजता छापा मारला. यावेळी मेमन हा आपल्याकडे असलेले कर्मचारी पुंजाराम मेघवाल, बसकीराम मेघवाल यांच्या मदतीने विनापरवाना गुटख्याची निर्मिती करत असल्याचे दिसून आले. यावेळी येथे मशिन्स, कच्चा माल व विविध कंपन्यांच्या नावे तयार केलेला गुटखा मिळून आला. या सर्वाची किंमत 16 लाख 84 हजार 510 रूपये इतकी झाली.

हे साहित्य अन्न सुरक्षा मानदे कायदे तरतुदीनुसार तसेच गुटखा कंपनी महाराष्ट्र शासनाच्या प्रतिबंधित येत असल्याने मेमन याला हे माहित असूनही तो गुटखा उत्पादन करीत असल्याचे आढळून आल्याने जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीने हा सर्व माल कार्यवाहीसाठी अन्य व औषध प्रशासनाकडे देण्यात आला असून पुढील कारवाई हा विभाग करणार आहे.

या मोहिमेत वरील अधिकाऱयांसह उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष माने, हे. कॉ. दिनेश आखाडे, राकेश बागूल, उदय वाजे, अरूण चाळके, गुरू महाडिक, संजय जाधव, दत्ता कांबळे आदींनी सहभाग घेतला.

गेल्या काही वर्षापासून गुटखा विक्रीवर पूर्णपणे बंदी आहे. असे असतानाही अनेक ठिकाणी चोरटय़ा पद्धतीने काही कोड वापरून ही विक्री केली जात असतानाच हा गुटखा बनवणारा कारखानाच येथे सापडल्याने खळबळ उडाली आहे. एवढेच नव्हे तर यात काही स्थानिकांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्यादृष्टीने तपास करण्याची मागणी होत आहे.

Related posts: