|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रमेश कदम यांचा भाजपलाही रामराम!

रमेश कदम यांचा भाजपलाही रामराम! 

ना बैठकीचे निमंत्रण, ना जबाबदारी,

गरज नसल्याने पक्षत्यागाचा निर्णय,

चार समर्थक नगरसेवक तटस्थ

प्रतिनिधी /चिपळूण

राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आठ महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार रमेश कदम यांनी आता भाजलाही ‘रामराम’ म्हटले आहे. पक्षाच्या कुठल्याही बैठकीचे वा कार्यक्रमाचे निमंत्रणही की पक्षाची कोणती जबाबदारीही आपल्यावर देण्यात आली नाही. त्यामुळे पक्षाला आपली गरज नसल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळेच आपण पक्षत्याग करीत असल्याची माहिती कदम यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. नगरपरिषदेत भाजपला पाठिंबा देणारा चार समर्थक नगरसेवकांचा गट यापुढे स्वतंत्र राहणार असल्याचेही कदम यानी स्पष्ट केले.

जिल्हय़ाच्या राजकारणात केल्या तीस वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले माजी आमदार कदम यांनी 1998मध्ये कॉंग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर गेल्या लोकसभेवेळी शेकापच्या माध्यमातून निवडणूक लढवल्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास करताना आठ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या काही दिवसांपासून कदम हे भाजपात नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षत्यागाचा निर्णय जाहीर केला. गेल्या आठ महिन्यात पक्षाचे अनेक कार्यक्रम झाले, बैठका झाल्या. मात्र आपल्याला बोलावले नाही. साधे निमंत्रणही दिले गेले नाही. पक्षप्रवेशाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेत दिलेली आश्वासनेही पूर्ण केली गेली नाहीत. भाजपकडून ज्यांचा तालुक्याशी संबंध नाही अशांच्या नेमणुका येथे केल्या जात आहेत. आपल्याला फक्त बसवून ठेवले आहे. त्यामुळे आपण पक्षत्यागाचा निर्णय घेतला असून यापुढे या पक्षाशी आपला कोणताही संबंध राहणार नाही. यापुढे कोणत्या पक्षात जाणार आहोत याचा अद्याप विचार केलेला नाही. लवकरच कार्यकर्त्यंचा मेळावा घेऊन राजकारणातील पुढील दिशा स्पष्ट करू.

यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावार टीका केली, लोकांची कामे होत नसतील आणि विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचारच होत असेल तर आपण यावर आक्रमक होवून पावले उचलू. परिवर्तनच्या नावाखाली हे सत्तेवर आले व लाखो रुपयांचा टेंडर घोटाळा सुरू आहे. त्यामुळे आमच्या नगरसेवकांचा गट स्वतंत्र आहे तो यांना पाठिंबा देणार नाही. प्रामाणिक व विधायक काम असेल तर जरुर विचार करू, मात्र आजपासून आम्ही नगरपालिकेत स्वतंत्र आहोत असेही कदम यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. सावित्री होमकळस, अजमल पटेल, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, सुरेश कदम यांच्यासह माजी नगरसेवक, पदाधिकारी समर्थक उपस्थित होते.

Related posts: