|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » एफटीआयआय अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती

एफटीआयआय अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियुक्ती 

बॉलिवूडच्या डॅडींकडे चित्रपट संस्थेचे पालकत्व

पुणे / प्रतिनिधी

फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली. गजेंद्र चौहान यांच्या जागी खेर यांची निवड झाली आहे.

गजेंद्र चौहान यांची 2015 साली एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून एफटीआयआयमध्ये वाद झाला होता. 141 दिवस विद्यार्थ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यामुळे मार्च 2017 मध्ये कार्यकाल पूर्ण होताच त्यांनी काढता पाय घेतला होता. आपल्या चौदा महिन्यांच्या कार्यकाळात चौहान यांनी बैठकीला फक्त एकदाच हजेरी लावली. मागच्या काही दिवसांपासून गजेंद्र चौहान यांच्या जागी अन्य कलाकाराची या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर अनुपम खेर यांची या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

खेर हे एक सकस अभिनेते असून, त्यांनी कर्मा, हम आपके है कौन, सारांश यांसह विविध चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. मैने गांधी को नही मारा, डॅडी या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. खेर यांनी चित्रपट क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन सन्मानित केले आहे. खेर यांनी चरित्रात्मक भूमिका करीत बॉलिवूडवर दीर्घकाळ छाप सोडली. खेर यांनी पाचशेहून अधिक चित्रपटात काम केले आहे. फिल्म फेअरचे सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेते म्हणूनही तब्बल सहा वेळा त्यांना गौरविण्यात आले आहे.

मोदींचा वरदहस्त

अनुपम खेर हे मोदींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून वाद पेटला असताना अनुपम खेर यांनी सरकारची बाजू लावून धरली होती. त्याचे फळ म्हणून खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची चर्चा आहे.

भरीव काम करण्याचा प्रयत्न : खेर

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अनुपम खेर म्हणाले, आत्तापर्यंत अनेक दिग्गज कलावंतांनी एफटीआयआयचे अध्यक्षपद भूषविले आहे. आता मलाही या पदावर काम करण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य मानतो. आपण या माध्यमातून अधिकाधिक भरीव काम करण्याचे प्रयत्न करू.

पाच जणांवरील कारवाईने  विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात

एफटीआयआयमधून पाच विद्यार्थ्यांना काढून टाकण्यात आल्याने पुन्हा वादाला सुरुवात झाली आहे. या विद्यार्थ्यांना तीन दिवसांच्या आत होस्टेल सोडून जाण्यास सांगण्यात आले आहे. अनुपम खेर यांची नियुक्ती होत असतानाच ही कारवाई झाली असून, प्रकरण चिघळण्याची शक्मयता आहे.

एफटीआयआयच्या दुसऱया वषीच्या पाच विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्यानंतर या बॅचमधील सर्व 47 विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असून,   त्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱया वर्षाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यासक्रमामधे दहा मिनिटांची शॉर्ट फिल्म बनवायची असते. आधी त्यासाठी तीन दिवस वेळ दिला जायचा. मात्र यावेळी त्यासाठी दोनच दिवस वेळ देण्याचा निर्णय एफटीआयआयच्या प्रशासनाने घेतला. विद्यार्थ्यांनी या गोष्टीला विरोध केला. फिल्मसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला पहिल्या गटातील पाच विद्यार्थी 9 तारखेला गैरहजर राहिले. त्यानंतर दुसऱया दिवशी बोलावण्यात आलेल्या बैठकीला विद्यार्थ्यांचा दुसरा गटही गैरहजर राहिला. त्यामुळे एफटीआयआय प्रशासनाने पहिल्या गटातील पाच विद्यार्थ्यांवर कारवाई केली असून दुसऱया गटातील विद्यार्थ्यांनाही याला सामोरे जावे लागेल, अशी नोटीस बजावली आहे. मात्र सर्व 47 विद्यार्थ्यांनी शॉर्ट फिल्मसाठीची दोन दिवसांची मुदत मान्य न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts: