|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » क्रिडा » अर्जेन्टिना, पोर्तुगाल विश्वचषकासाठी पात्र

अर्जेन्टिना, पोर्तुगाल विश्वचषकासाठी पात्र 

विश्वचषक पात्रता लढती : मेस्सीची हॅट्ट्रिक तर पोर्तुगीजांना स्वयंगोलाचा लाभ

वृत्तसंस्था/ क्विटो, इक्वेडोर

अर्जेन्टिना, पोर्तुगाल यांनी पुढील वषी रशियात होणाऱया फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील स्थान निश्चित केले आहे.

अर्जेन्टिनाने पात्रता फेरीतील याआधीच्या सामन्यांत अपेक्षित कामगिरी केली नव्हती. त्यामुळे त्यांच्या विश्वचषक प्रवेशालाच धोका निर्माण झाला होता. मात्र येथे झालेल्या इक्वेडोरविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात सुपरस्टार लायोनेल मेस्सीने एकहाती यश मिळवून देत अर्जेन्टिनाचे विश्वचषकातील स्थान निश्चित केले. पिछाडीवर पडल्यानंतरही मेस्सीच्या हॅट्ट्रिकच्या बळावर अर्जेन्टिनाने 3-1 असा विजय मिळविला. रोमारिओ इबाराने 38 व्या सेकंदाला इक्वेडोरचा गोल नोंदवून अर्जेन्टिनाला चकित केले होते. पण मेस्सीने पहिल्या 20 मिनिटांतच दोन गोल नोंदवून अर्जेन्टिनाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात त्यात त्याने आणखी एका गोलाची भर घालत हॅट्ट्रिक पूर्ण केली.

इक्वेडोरचा 38 सेकंदात गोल

सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला अर्जेन्टिनाच्या बचावफळीतील सुस्तपणाचा लाभ घेत इक्वेडोरने पहिले यश मिळविले. अर्जेन्टिनाच्या जेवियर मास्चेरानोला दारिओ ऐमरकडून लांबवरून आलेल्या पासला व्यवस्थित हाताळता आले नाही. त्याने हेडरद्वारे चेंडू क्लीअर करण्याचा प्रयत्न केला. पण तो नेमका इबाराच्या पुढय़ात पडला. इबाराने हेडर करून तो सहकारी रॉबर्टो ऑर्डोन्सकडे सोपविला. पण त्यानेही हेडर करून पुन्हा तो इबाराकडे सोपविल्यावर त्याने चेंडूला जाळय़ाची दिशा दिली. इक्वेडोरच्या चपळ खेळावर अर्जेन्टिनाला प्रारंभी स्थिर होण्यास वेळ लागला. पण मेस्सीने सुरुवात करून दिल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 12 व्या मिनिटाला त्याने अँजेल डी मारियाकडून मिळालेल्या पासवर अर्जेन्टिनाला बरोबरी साधून दिली. आठ मिनिटांनंतर त्यानेच ही आघाडी 2-1 अशी केली. आघाडी घेतल्यानंतर अर्जेन्टिनाचा आत्मविश्वास वाढला आणि चेंडू जास्तीत जास्त आपल्या ताब्यात ठेवत इक्वेडोरला संधी मिळू दिली नाही. 62 व्या मिनिटाला मेस्सीने हॅट्ट्रिकचा गोल नोंदवून अर्जेन्टिनाचा विजय व वर्ल्डकपमधील स्थानावर शिक्कामोर्तब केला.

पोर्तुगालची स्वित्झर्लंडवर मात

लिस्बन येथे झालेल्या गट ब मधील एका सामन्यात युरोपियन चॅम्पियन्स पोर्तुगालनेही स्वित्झर्लंडवर 2-0 असा विजय मिळवित पुढील वर्षीच्या विश्वचषकात स्थान मिळविले. या सामन्यात पोर्तुगालला स्वित्झर्लंडने केलेल्या स्वयंगोलाचा लाभ झाला. त्यांचा डिफेंडर जोहान डोरूने पूर्वार्ध संपण्यास चार मिनिटे बाकी असताना स्वतःच्याच गोलजाळय़ात चेंडू मारल्याने पोर्तुगालला आघाडी मिळाली. दुसऱया सत्रात 57 व्या मिनिटाला आंदे सिल्वाने गोल नोंदवून पोर्तुगालचा विजय निश्चित केला. या विजयानंतर पोर्तुगालचे स्वित्झर्लंडइतकेच 27 गुण झाले. पण सरस गोलसरासरीमुळे पोर्तुगालला गटात अग्रस्थान मिळाले.

गेल्या सप्टेंबरमध्ये बॅसेलमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात स्वित्झर्लंडने पोर्तुगालवर 2-0 असा विजय मिळविला व त्यानंतर त्यांनी सर्व 9 सामने जिंकून गटात अग्रस्थान पटकावले होते. त्यांची ही विजयी घोडदौड अखेर पोर्तुगालने रोखली. पोर्तुगालनेही याआधीचे आठ सामने जिंकले आहेत. स्वित्झर्लंडला आता अन्य एका युरोपियन संघांविरुद्ध प्लेऑफ लढत खेळावी लागणार आहे. प्लेऑफचा ड्रॉ पुढील मंगळवारी काढण्यात येणार आहे. येथील सामन्यात रोनाल्डोला पात्रता फेरीतील 16 वा गोल नोंदवण्याची संधी 78 व्या मिनिटाला मिळाली होती. पण गोलरक्षकाला हुलकावणी देण्याच्या प्रयत्नात त्याला चेंडूवर ताबा घेण्याची संधी दिल्याने रोनाल्डोचा हा प्रयत्न फोल ठरला.