|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या संपर्कात

राष्ट्रवादीचा एक गट भाजपच्या संपर्कात 

प्रशांत माने/ सोलापूर

राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सोलापुरातील अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा तर होत्याच पण मंगळवार, 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचा एक गट पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेला होता. मुख्यमंत्री व्यस्त असल्याने चर्चेचा मुहूर्त आता 14 ऑक्टोबर ठरल्याचे काँगेसमधून भाजपमध्ये गेलेल्या एका माजी आमदाराने सांगितले. पालकमंत्री विजयकुमार देशमुखांसह या गटाची खलबत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ यांच्या दालनात सुरु होती.

सोशल मिडियासह समाजातून भाजपविरोधी चर्चा सुरु झाल्यानंतर आणि नोटबंदी, जीएसटीसह वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी व काँग्रेसने सोलापुरात भाजप विरोधात आंदोलन, मोर्चा काढून वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे. 2019 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होत असून सर्वच पक्षांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या राष्ट्रवादीने सोलापुरात पुन्हा जम बसविण्याचा जोरकस प्रयत्न सुरु केला असला तरी अंतर्गत गटबाजीने पोखरलेल्या राष्ट्रवादीला पक्षाचे गड पक्षातच शाबूत रहातील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये ताकदवर असलेल्या राष्ट्रवादीला गेल्या काहीवर्षात गटबाजीचे ग्रहण असून ते पक्षाच्या वरिष्ठांनी घातलेल्या खतपाण्यामुळे अधिक काळेकुट्ट झालेले आहे.

राष्ट्रवादीमधील युवा नेत्यांचा एक गट मागेच राष्ट्रवादीला रामराम ठोकून तिसऱया आघाडीच्या रुपाने उदयास आला आहे. या तिसऱया आघाडीने भाजपाच्या पाठिब्यांवर महायुती करुन जिल्हा परिषद, काही नगरपालिका ताब्यात घेत राष्ट्रवादीला अगोदर धक्का दिला आहे. तरीही राष्ट्रवादीमधील गटबाजी थांबविण्यास पक्षाच्या सर्वासर्वे वरिष्ठांना यश आलेले नाही तर तसा प्रयत्नही त्यांच्याकडून झाल्याचे दिसले नाही. पक्षाकडून वादही मिटवले जात नाहीत आणि खच्चिकरणही होत असल्याने आगामी सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीतील नाराज गटांनी भाजपशी संपर्क वाढवला आहे.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूरच्या राजकारणात अनेक नवीन कलाटण्या दिसून आल्या तरी आश्चर्य वाटायला नको, असे सध्याच्या राजकीय हालचालीवरुन दिसत आहे. सोलापूर जिह्यातील 11 तालुक्यातील सातत्याने बदलणाऱया राजकीय समिकरणामुळे पुढील निवडणुकीत कोणत्या पक्षाचा कोणता नेता भाजपमध्ये दिसेल हे पाहणे उत्सुकतेचे आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी भाजपचे उमेदवार हे राष्ट्रवादी व काँग्रेसमधील काही नेते दिसले तरी आश्चर्य वाटायला नको, हे सध्याची राजकीय परिस्थती पाहता स्पष्ट होत आहे.

मंगळवारी मंत्रालयात सोलापूर जिह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा एक गट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी तब्बल दोन तास मुख्यमंत्री कार्यालयात बसून होता. यात फलटणच्या एका राजकीय नेत्याचाही समावेश होता. परंतु परदेश दौऱयाच्या तयारीत व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांनी या गटाच्या बैठकीसाठी शनिवार, 14 ऑक्टोबरची वेळ दिल्याचे शिष्टमंडळात उपस्थित सध्या भाजपवासी असलेल्या एका माजी आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप दिड ते दोन वर्षांचा कालावधी असून या कालावधीत पूलाखालून बरेच पाणी वाहून जाणार आहे. थोरल्या व धाकल्या पवारांनी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी जोर लावला तर भाजपच्या वाटेवर असलेल्या अनेकांना बेक लागण्याचीही शक्यता आहे. परंतु नाराजांची मने खूप दुखावलेली असल्याने आणि भाजपाचे जहाज सध्या मोदी लाटेवर तरंगत असल्याने दोन्ही काँग्रेसच्या बुडालेल्या नावेत बसण्यापेक्षा सत्तेत तरंगणाऱया जहाजात बसण्यासाठी अनेकजण उत्सुक असणार हे निश्चित. पण भाजपाच्या गळाला राष्ट्रवादी व काँग्रेसचे कोणते दिग्गज मासे लागणार हे पाहण्यासाठी सोलापूकरांना आणखी काहीकाळ वाट पहावी लागणार आहे.

Related posts: