|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तुडुंब भरलेल्या बंधाऱयात दोन सख्ख्या भावासहीत एकाचा बुडून मृत्यू

तुडुंब भरलेल्या बंधाऱयात दोन सख्ख्या भावासहीत एकाचा बुडून मृत्यू 

प्रतिनिधी/ सांगोला

तालुक्यातील वाकी (शिवणे) येथे पावसाने ओढय़ावरचा बंधारा तुडुंब भरुन वाहत आहे. त्यामध्ये लहान मुले गेली होती त्यापैकी एकजण पाय घसरुन बंधाऱयात पडला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या सहाजणांपैकी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये महादेव पांडुरंग कांबळे, (वय 60), सदाशिव पांडुरंग कांबळे (वय 55) हे दोघे सख्खे भाऊ असून खजु महादेव चव्हाण (वय 45 सर्वजण रा. वाकी (शिवणे) या तिघांचा समावेश आहे. तर मुन्ना कुमार (वय 30), पप्पु पोपट चव्हाण (वय 28) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे पाठविले आहे तर गजानन सदाशिव कांबळे (वय 25) याची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दोन दिवसात संपूर्ण तालुक्यात पावसाने हाहाकार माजविला असून तालुक्यातील ओढे व बंधारे तुडुंब वाहत आहेत. एकीकडे तालुक्यातील जनता समाधानकारक पाउढस पडल्याने आनंदात असताना वाकी (शिवणे) गावात मात्र शोककळा पसरली आहे. बुधवार 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास रामचंद्र खजु चव्हाण, आनंद अहिवळे व व्यंकटेश पवार हे तिघे गावाशेजारी असलेल्या बंधारा पाहण्यासाठी गेले त्यातील एकाचा पाय घसरुन तो पाण्यात पडला.

ही बातमी समजताच महादेव पांडुरंग कांबळे, सदाशिव पांडुरंग कांबळे, खजु महादेव चव्हाण, मुन्ना कुमार, गजानन सदाशिव कांबळे, पप्पु पोपट चव्हाण हे सहाजण त्यांना वाचविण्यासाठी गेले. पाण्यात बुडाल्याची बातमी वाऱयांसारखी गावात पसरल्यानंतर लोकांनी बुडलेल्यांना पाण्याच्या बाहेर काढुन सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले. त्यावर डॉक्टरांनी पाहणी करुन त्यातील महादेव पांडुरंग कांबळे, सदाशिव पांडुरंग कांबळे व खजु महादेव चव्हाण यांना मृत घोषीत केले व मुन्ना कुमार व पप्पु पोपट चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी सोलापुर येथे पाठविले. तर गजानन सदाशिव कांबळे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

बुधवारी दुपारनंतर या घटनेमुळे संपुर्ण वाकी (शिवणे) गावावर शोककळा पसरली. सदर मृत व जखमींना सांगोल्यातील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता नागरीकांची गर्दी झाली होती. ग्रामीण रुग्णालयाला आ. गणपतराव देशमुख, शहाजीबापु पाटील, सभापती मायाक्का यमगर, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार संजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे, गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे, जि. प. सदस्य दादासो बाबर, ऍड. सचिन देशमुख, अतुल पवार, पं. स. सदस्य सुभाष इंगोले, नगरसेवक आनंदा माने, पोलिस निरीक्षक केंद्रे, ऍड. विश्वास गायकवाड व खंडुतात्या सातपुते यांनी तातडीने भेटी दिल्या.

 

 

Related posts: