|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत युवकाचा खून : चौघे ताब्यात

सांगलीत युवकाचा खून : चौघे ताब्यात 

प्रतिनिधी/ सांगली

 सांगली मिरज रोडवर भारती हॉस्पीटलच्या बाजूला असणाऱया वॉनलेस चेस्ट हॉस्पीटल क्वार्टर्समध्ये युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. राहुल जयेंद्र लोंढे वय 22 असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घटना घडली असून विश्रामबाग पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

याबाबत माहिती अशी, भारती हॉस्पीटलच्या बाजूला असणाऱया वॉनलेस चेस्ट हॉस्पीटल परिसरात अनेक कुटूंबे राहण्यासाठी आहेत. राहुल लोंढे हा वॉनलेस चेस्ट हॉस्पीटलच्या बंद पडलेल्या ओपीडीजवळ आई वडीलांसह रहात होता. त्याचा एक भाऊ बेळगाव येथे हॉस्पीटलमध्ये ब्रदर म्हणून नोकरी करतो. तर राहुलने विश्रामबाग चौकातील एका हॉस्पीटलमधून ब्रदरची नोकरी नुकतीच सोडली आहे. वडील भारती हॉस्पीटलमध्ये रखवालदाराची नोकरी करतात. तर आईला कॅन्सर झाल्याने नुकतेच ऑपरेशन झाले. दररोज रात्री जेवण संपल्यानंतर तो चेस्ट हॉस्पीटलच्या ओपीडीमध्ये झोपत होता. मंगळवारी रात्री कुपवाड येथे ख्रिश्चन धर्मियांच्या एका भजन कार्यक्रमासाठी तो गेला होता.

दहा ते साडेदहाच्या सुमारास तो घरी आला. एका मित्राचा वाढदिवस असल्याने बाहेरच केक कापला. त्यानंतर तो बहिणीकडून चादर घेऊन नेहमीप्रमाणे चेस्ट हॉस्पीटलच्या ओपीडीमध्ये झोपण्यासाठी गेला. वडील घरी नव्हते. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत तो झोपेतून उठला नसल्याने आईने ओपीडीच्या इमारतीशेजारी कट्टयावर बसलेल्या मित्रांना सांगितले. राहुल घरी आला नसल्याचे सांगितल्यावरून मित्रांनीही चौकशी केली असता इमारतीच्या बंद दरवाजाबाहेर त्याचे चप्पल दिसले. त्यानंतर आईने दार उघडून पाहिले असता राहुल रक्ताच्या थारोळयात पडल्याचे दिसले. डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. पोलीसांना याची माहिती देण्यात आली. दुपारी पंचनामा करून पोलीसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात पाठवला. याप्रकरणी पोलीसांनी चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते. उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related posts: