|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विहिरीत पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू

विहिरीत पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू 

वार्ताहर /बेडकिहाळ :

शमनेवाडी (ता. चिकोडी) येथील कोगनोळे मळा परिसरातील रहिवासी उज्ज्वला महादेव कोगनोळे (वय 45) हिचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 2 च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी महिलेच्या भावाने सदलगा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, उज्ज्वला या आपल्या घरापासून उत्तरेकडील दूधगंगा नदीमार्गावर असलेल्या मुन्नोळे मळा परिसरातील विहिरीवर धुणे धुण्यासाठी गेल्याचे समजते. सकाळी 11 च्या दरम्यान पत्नी घरी न परतल्याने पती महादेव हा मुन्नोळे यांच्या विहिरीवर गेल्यानंतर त्यांना उज्ज्वलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्याने तत्काळ घटनेची माहिती नातेवाईक व उज्वलाच्या माहेरी दुपारी 2 च्या सुमारास कळविली.

 घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे फौजदार संगमेश दिडगीनहाळ, एएसआय देसाई, बीट पोलीस चंद्रकांत सारापुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. दुपारी 4 वाजता मृतदेह पाण्यावर बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. सदलगा येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी पुढील तपास शवविच्छेदनाच्या अहवालानंतर करण्यात येणार असल्याची माहिती सदलगा पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी ग्रा. पं. अध्यक्ष दीपक खोत यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. उज्ज्वला यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.