|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात पावसाची दिवाळी ; काही तासांत 101 मिमी

पुण्यात पावसाची दिवाळी ; काही तासांत 101 मिमी 

पुणे / प्रतिनिधी :

पुणे शहर व परिसरात पावसाने शुक्रवारी अक्षरश: दिवाळी साजरी केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या धुवाँधार पावसाने शहराला पार धुवून काढले. अवघ्या काही तासांत शहरात तब्बल 101 मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, येत्या 48 तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

मागच्या आठवडाभरापासून पुणे व परिसरात जोरदार परतीचा पाऊस होत आहे. दुपारी वा रात्रीच्या सुमारास विविध भागांत वेगवेगळय़ा तीव्रतेने होणाऱया या पावसाने प्रामुख्याने पुणे शहराला शुक्रवारी झोडपले. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या पावसाचा जोर काही क्षणात प्रचंड वाढला. आभाळ फाटल्याप्रमाणे झालेल्या या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळित झाले. शहराच्या विविध भागांत पावसामुळे पाणी साचले. रस्ते, चौक जलमय झाल्याने वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम झाला. काही भागात झाडे कोसळण्याच्याही घटना घडल्या. पहिल्या तासाभरात पावसाचा जोर अधिक होता. त्यानंतर तो मंदावला. सायंकाळपर्यंत पुण्यात तब्बल 101 मिमी पावसाची नोंद झाली.

खरेदीवर पावसाचे पाणी

यंदा पुणे शहर व जिल्हय़ात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. आता परतीचा पाऊसही जोरात होत आहे. दिवाळी तोंडावर असताना हा पाऊस होत असल्याने पुणेकरांच्या दिवाळी खरेदीवर पाणी फेरले गेले आहे. दिवाळसण तरी पाऊस साजरा करून देणार का, अशी धास्ती पुणेकरांमध्ये आहे. पुणे व परिसरात पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे.

Related posts: