|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कंटेनरखाली मिनीडोअर रिक्षा चिरडून 5 ठार

कंटेनरखाली मिनीडोअर रिक्षा चिरडून 5 ठार 

पोलादपूर हद्दीतील घटना, 7 जखमी, मृतांमध्ये 6 वर्षाच्या बालकाचा समावेश, दीड वर्षाचा चिमुरडा बालंबाल बचावला

प्रतिनिधी /खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील पार्ले ते दिविलनजीक शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास 8 आसनी मिनिडोअर रिक्षा कंटेनरखाली चिरडून 5 जणांचा जागीच अंत झाला. मृतांमध्ये 6 वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. दीड वर्षाचा चिमुरडा मात्र बालंबाल बचावला. या अपघातात अन्य 7 जण जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचालकाने पलायन केले. अपघाताने महामार्गावरील वाहतुकीचाही खोळंबा केला.

या अपघातात रिक्षाचालक मुझफ्फर उस्मान येलूकर (40, माटवण मोहल्ला-पोलादपूर), निकम अंबाजी कांबळे (38), नाबीबाई बाबुराव जाधव (70, दोघेही चांढवे खुर्द बौद्धवाडी-महाड), दिनेश शंकर चोरगे (40, रानवडी-खडकवाडी, पोलादपूर) या चौघांचा जागीच अंत झाला. सोहम सचिन जाधव या 6 वर्षीय बालकाला महाड येथे उपचारार्थ नेत असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. रूद्र रमेश चव्हाण हा दीड वर्षाचा मुलगा मात्र सुदैवाने बचावला. इतर दोन प्रावासी रिक्षाबाहेर फेकले गेल्याने बचावले.

जखमींमध्ये रवीना राकेश चाळके (40), देवेश राकेश चाळके (7), श्रीमती इंदू विठोबा चव्हाण (54), अनिता गणपत पवार (64, चौघेही चांढवे खुर्द महाड), संतोष वसंत पोळेकर (29), दशरथ नारायण सुतार (46, दोघेही नडगाव-महाड) यांचा समावेश आहे. जखमींना स्थानिक पोलीस व मदतकर्त्यांनी तातडीने पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले.

8 आसनी मिनिडोअर रिक्षा पोलादपूरच्या दिशेने चालली असताना गोव्याहून मुंबईकडे जाणाऱया भरधाव कंटेनरची मिनिडोअरला जोरदार धडक बसली. धडकेनंतर कंटेनर मिनिडोअरला फरफटत नेत साईडपट्टी नसलेल्या ठिकाणी जाऊन थांबला. अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा होऊन आतमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकर्त्यांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

अपघातामुळे वाहतुकीचाही चांगलाच खोळंबा झाला. अपघाताचे वृत्त कळताच पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक अनिल अंधेरे यांच्यासह पोलीस सहकाऱयांनी घटनास्थळी पोचत मदतकार्य केले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. अपघाताचे वृत्त कळताच मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत एकच हंबरडा फोडला. या आक्रोशाने उपस्थित सारेजण हेलावले.

सोहमचा शाळेचा शेवटचाच दिवस ठरला!

या भीषण अपघातात मृत्यूने कवटाळलेला सोहम जाधव लोहारमाळ येथील सानेगुरूजी प्राथमिक विद्यालयात पहिलीत शिकत होता. नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी तो या रिक्षामध्ये बसला होता. शाळेपासून अवघ्या काही मिनिटांवर असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related posts: