|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » क्रिडा » ओलसर मैदानामुळे तिसरा सामना रद्द

ओलसर मैदानामुळे तिसरा सामना रद्द 

तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 बरोबरीत

वृत्तसंस्था/हैदराबाद

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा व शेवटचा सामना मैदान ओले असल्याने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.

गेले दोन आठवडे येथे पाऊस होत असल्याने मैदानात बरेच पाणी मुरले आहे. सामन्याच्या प्रारंभी थोडा वेळ पाऊस आला होता. पण नंतर तो थांबल्यानंतर मैदान कर्मचाऱयांनी खेळपट्टीभोवतालच्या परिसरातील ओलावा घालविण्याचा बराच प्रयत्न केला. पण त्यात त्यांना पूर्ण यश आले नाही. खेळपट्टी, गोलंदाजांच्या रनअपचा परिसर बऱयापैकी सुकला होता. पण जवळच थोडेसे पाणी साचले होते. पंचांनी त्याची तपासणी केली तेव्हा तो भाग निसरडा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सामनाधिकारी रिचर्डसन यांनी दोन्ही कर्णधार व पंचांशी चर्चा करून रात्री साडेआठच्या सुमारास हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याचे नाणेफेकसुद्धा झाली नव्हती. त्याआधी पंचांनी तीनदा मैदानाचे निरीक्षण केले होते.

या मालिकेतील पहिला सामना रांचीत झाला होता. त्यावेळीही पावसाचा व्यत्यय आला होता. पण डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे भारताने तो सामना 9 गडय़ांनी जिंकून आघाडी घेतली होती. गुवाहाटी येथे झालेल्या दुसऱया सामन्यात मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा 8 गडय़ांनी पराभव करून मालिकेत बरोबरी साधली होती. या तिसऱया सामन्याने ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱयाची सांगता झाली असून भारताची पुढील वनडे मालिका न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. यासाठी न्यूझीलंड संघ भारतात शुक्रवारी दाखल झाला असून पहिला वनडे सामना 22 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे.