|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रचार थांबला, उद्या मतदान

प्रचार थांबला, उद्या मतदान 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

जिल्हय़ात 16 ऑक्टोबरला होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा जाहीर प्रचार शनिवारी थांबला. यावेळी प्रथमच थेट सरपंच पदाची निवडणूक होत असल्याने इच्छुक उमेदवारांची प्रचारासाठी गाव पिंजून काढताना चांगलीच दमछाक झाली. 16 ऑक्टोबर रोजी मतदान, तर 17 रोजी मतमोजणी होणार आहे.

 विधानसभा, लोकसभा निवडणुकांवर ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा फारसा फरक पडत नाही. परंतु ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे ग्रामस्तरापासून पक्ष बांधणी असते. त्यामुळे पक्षीय चिन्हावर ग्रामपंचायत निवडणूक लढविली जात नसली, तरी सर्वच राजकीय पक्षांनी तन, मन, धन अर्पून निवणुकीकडे लक्ष दिले आहे. बडय़ा नेत्यांच्या जाहीर प्रचार सभा झाल्या नसल्या, तरी वाडय़ा वाडय़ावर प्रचार सभा झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या उमेदवारचा प्रचार प्रभागापुरता मर्यादित असतो. परंतु, थेट सरपंच पदाच्या निवडणुकीमुळे संपूर्ण गावच प्रचारासाठी पिंजून काढावा लागत आहे. त्यामुळे या वेळच्या निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.

16 ऑक्टोबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर मंगळवारी 17 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदानासाठी एकूण 1 हजार 29 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस कर्मचारी, होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हय़ात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास जिल्हय़ाबाहेरूनही जादा पोलीस कुमक मागविण्यात आली आहे. 279 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. तर 2621 ग्रा. पं. सदस्य निवडीपैकी 926 सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरित 1735 सदस्य निवडीसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी एकूण 4 लाख 2 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Related posts: