|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी कर्मचाऱयांची यंदाची काळी दिवाळी!

एसटी कर्मचाऱयांची यंदाची काळी दिवाळी! 

बेमुदत संप अटळ : कामगार संघटना व इंटकतर्फे संयुक्त प्रसिद्धीपत्रक

प्रतिनिधी / कणकवली:

रा. प. महामंडळाच्या प्रशासनाने दिवाळीपूर्वी एसटी कामगारांना 15 ते 20 हजारपर्यंत रक्कम मिळणार, असे जाहीर केले होते. प्रत्यक्षात एसटी कर्मचाऱयांना जाहीर केलेल्या रकमेच्या निम्मीही रक्कम मिळत नाही. एसटी कर्मचाऱयांची ही दिशाभूल असून त्यांच्या न्याय हक्कांपासून दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही एसटी कर्मचाऱयांची काळी दिवाळी असून 16 ऑक्टोबरपर्यंत मागण्यात मान्य न झाल्यास बेमुदत संप अटळ असल्याचे एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिलीप साटम, अध्यक्ष किशोर धालवलकर, इंटकचे विभागीय अध्यक्ष अशोक राणे व सचिव एच. बी. रावराणे यांनी म्हटले आहे.

याबाबत दोन्ही संघटना पदाधिकाऱयांनी संयुक्तरित्या प्रसिद्धीपत्रक दिले असून 16 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास कर्मचाऱयांना नाईलाजास्तव बेमुदत संपावर जावे लागणार असल्याचे म्हटले आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱयांना दिवाळीसाठी अडिच हजार, तर अधिकाऱयांना पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. एसटी कर्मचाऱयांना मिळणारे वेतन हे राज्य व केंद्र शासनाच्या वेतनापेक्षा पाचपटीने कमी आहे. कामगार कराराची मुदत 31 मार्च 2016 रोजी संपली. कराराची मुदत संपून दिड वर्ष उलटले, तरीही वेतनवाढ मिळालेली नाही. तसेच नियमानुसार मिळणारा महागाई भत्ताही देण्यात आलेला नव्हता.

अशा परिस्थितीत एसटी कर्मचारी मेटाकुटीस आलेले आहेत. इतर राज्यांप्रमाणे कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्यासाठी कामगार संघटना व इंटक प्रयत्नशील आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याला नकार येत आहे. त्यामुळेच या संघटनांनी संपाची हाक दिली आहे. प्रशासनाकडून कर्मचाऱयांचा सहानुभूतीपूर्वक विचार न करता, कर्मचाऱयांच्या भावनांशी खेळून संपाच्या स्थगितीसाठी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयानेही वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला फटकारत स्थगितीला नकार दिला आहे. प्रशासनाला 16 जुलैपासूनचा थकित महागाईभत्ता व तरतुदीनुसार बोनस देण्याचे आदेश दिले. तरीही प्रशासनाने घाईगडबडीत तुटपुंजी दिवाळी भेट जाहीर केल्याचा आरोपही कामगार संघटना व इंटकने केला आहे.