|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऐन दिवाळीत प्रवाशांना वेठीस धरणे म्हणजे संवेदनाहीनतेचे प्रदर्शन

ऐन दिवाळीत प्रवाशांना वेठीस धरणे म्हणजे संवेदनाहीनतेचे प्रदर्शन 

प्रतिनिधी / कोल्हापूर

आपल्या अवाजवी व चुकीच्या  मागण्यासाठी ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस  धरून संप करणे, म्हणजे संवेदनाहिन नेतृत्वाचे प्रदर्शन  आहे. यामुळे या संपात सहभागी होऊ नये असे आवाहन  महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने व्यक्त केले आहे.

एस.टी. कर्मचाऱयांना शासकीय कर्मचाऱयांच्या तुलनेत वेतन कमी असून ते वाढले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱयांतून केली जात आहे. यासाठी काही संघटनांनी ऐन दिवाळीत संप करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची शनिवारी  जिल्हा काँग्रेस कमिटी कोल्हापूर येथे बैठक  झाली. त्या वेळी संपात सहभागी न होण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.   केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अवाजवी मागणी करून ती मान्य न झाल्यास बेमुदत संप पुकारण्याची भाषा करणे म्हणजे अपरिपक्वतेचे लक्षण असल्याचे मत कृती समितीने व्यक्त केले आहे.

वास्तविक अशा संपातुन ठोस काहींच हाती न लागता केवळ भावनेच्या आहारी जाऊन,कामगारांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेण्यासारखे आहे. एस टी प्रशासनास व्यवहारिक मागण्यांचा मसुदा देऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडविणे शक्य असताना, केवळ कोणाच्यातरी अविवेकी हट्टापायी संपा सारखे अंतिम हत्यार उपसणे चुकिचे आहे असेही कृती समितीने  म्हटले आहे.

एस टी कामगारांना थकीत एकरकमी महागाई भत्ता व दिवाळी भेट म्हणून रूपये 2500  देण्याचा  चांगला निर्णय परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष  दिवाकर रावते यांनी घेतला आहे. 18 वर्षानंतर कर्मचा-यांना गेली तीन वर्षे दिवाळी भेट म्हणून काही रक्कम मिळत आहे.त्या मुळे एसटी चा विवेकी कामगार संपा सारख्या कृतीला साथ देणार नाही.तरी  एस टी कर्मचा-यांनी या संपात सहभागी होऊ नये.

मा.कामगार न्यायालय लातूर, यांनी संपाला दिलेला अंतरिम स्थगिती आदेश, व मा.औद्योगिक न्यायालय,मुंबई यांचेकडे सुरू असलेली सुनावणी,या पाश्वभुमीवर कामगारानां संपासाठी उद्युक्त करणे ,म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचा जाणीवपुर्वक भंग करण्यासारखे असून याचे गंभीर परिणाम भविष्यात एस टी मधील कामगार चळवळीला भोगावे लागतील,याचाही संपकरी संघटनेने विचार करावा. ,केवळ भावनिक आवाहन करून कामगाराना चिथावणी देऊन संस्थेच्या आर्थिक  नुकसानीस कारण ठरण्याचा अताताईपणा संपाची नोटीस देणा-या कामगार नेतृत्वाने करू नये,असे  आवाहन या कृती  समितीच्या सदस्यानी व्यक्त केले.

मागील चार करारात मान्यताप्राप्त संघटना अपेक्षित वेतन वाढ करण्यास अपयशी ठरली. त्या मुळे शासकीय कर्मचा-यांच्या तुलनेत एस.टी. कामगारांना वेतन खूपच कमी आहे. व आता एवढी मोठी पोकळी एकूण वेळी भरून काढणे अवघड असून ज्यांच्यामूळे एस टी कर्मचा-यांना आज पगार कमी मिळतो त्यांनीच संप करणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा असल्याचा मतही   या वेळी  करण्यात आले

या बैठकीला महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव जितेंद्र इंगवले , महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे विभागीय सचिव संजीव चिकुर्डेकर  महिला आघाडी प्रमुख अनिता पाटील , कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे तराळ , महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे महावीर पिटके,तसेच दादू गोसावी व कृती समितीतील संघटनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी हजर होते बैठकीत संजीव चिकुर्डेकर, जितेंद्र इंगवले, अनिता पाटील,तराळ व  तकदीर  इचलकरंजी कर यांनी मार्गदर्शन केले. फोटो मध्ये कृती समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना संजीव चिकुर्डेकर सोबत डावीकडून जितेंद्र इंगवले आप्पा जाधव , अनिता पाटील.