|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुरुदासपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी

गुरुदासपूर पोटनिवडणुकीत काँग्रेसची बाजी 

चंढीगढ / वृत्तसंस्था

पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव करत दिवाळी साजरी केली. काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड हे तब्बल 1,93,219 मतांच्या फरकाने विजयी झाले. भाजप आणि अकाली दल युतीचे स्वर्ण सलारिया आणि आपचे सुरेश खजुरिया यांचा जाखड त्यांनी पराभव केला. अभिनेते, खासदार विनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या गुरुदासपूर मतदारसंघात 11 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता होती, मात्र काँग्रेस आणि भाजप उमेदवारांत चुरस झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यापासून भाजपचे सलारिया हे पिछाडीवर गेले. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी भाजपविरोधातील संताप व्यक्त केल्याचे जाखड यांनी म्हटले आहे. तर भरघोस मताधिक्याने झालेला विजय हा राहुल गांधी यांना दिवाळीची भेट असल्याचे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

केरळमधील वेंगारा विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी डाव्या पक्षाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रन्टच्या के. एन. ए. कादेर यांनी पी. पी. बशीर यांचा 23,310 मतांनी पराभव केला. भाजपचे उमेदवार के. जे. जनचंद्रन मास्टर यांना केवळ 5,728 मते मिळाली.