|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » शांघाय ओपनमध्ये फेडरर ‘चॅम्पियन’

शांघाय ओपनमध्ये फेडरर ‘चॅम्पियन’ 

अंतिम लढतीत अग्रमानांकित नादालवर एकतर्फी विजय

वृत्तसंस्था/ शांघाय

स्पेनचा स्टार खेळाडू व अग्रमानांकित राफेल नादालला एकतर्फी पराभूत करत रॉजर फेडररने शांघाय मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. फेडररचा नादालविरुद्ध सलग पाचवा विजय ठरला तसेच या विजयासह त्याने नादालच्या सलग 16 विजयांची मालिका खंडित केली. विशेष म्हणजे, फेडररचे शांघाय ओपनमधील दुसरे विजेतेपद तर कारकिर्दीतील 94 वे जेतेपद ठरले. शांघाय ओपनमधील दोन दिग्गजांमधील अंतिम सामना पाहण्यासाठी चिनी चाहत्यांनी गर्दी केली होती, हे वैशिष्ठय़ ठरले.

रविवारी शांघाय कोर्टवर नादाल व फेडरर यांच्यातील हा 38 वा ‘फेडाल ’सामना होता. त्यातील फेडररचा 15 वा विजय ठरला. नादालने 23 सामन्यात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून फेडररने सातत्याने नादालविरुद्ध विजय मिळवला आहे. शांघाय ओपनमधील अंतिम लढतीत फेडररने सामन्याची सुरुवात सर्विस ब्रेकसह दणक्यात केली आणि तोच धडाका कायम ठेवत अवघ्या 72 मिनिटांत नादालचा 6-4, 6-3 असा पराभव केला. फेडररचे हे शांघाय ओपनमधील दुसरे जेतेपद ठरले. याआधी, 2014 मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती.

शांघाय ओपनमध्ये फेडररचे नादालविरुद्ध 3-0 असे रेकॉर्ड केले आहे. कारकिर्दीतील 94 वे जेतेपद मिळवणाऱया 36 वर्षीय फेडररने इव्हान लेंडलच्या जेतेपदाच्या बरोबरी केली आहे. आता विजेतेपदाच्याबाबतीत केवळ जिमी कॉनर्स (97) त्याच्यापुढे आहे. तसेच एटीपी मास्टर्स श्रेणीच्या स्पर्धातील फेडररचा हा 350 वा विजय ठरला. या पराभवामुळे नादालच्या जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानाला धक्का बसणार नाही.