|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उपाययोजनेपेक्षा दाबोस प्रकल्पातून पाणीपुरवठा करा

उपाययोजनेपेक्षा दाबोस प्रकल्पातून पाणीपुरवठा करा 

प्रतिनिधी/ वाळपई

नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळपी गावात गेल्या चार दिवसापासून नागरिकांना भेडसावणाऱया वेगवेगळय़ा प्रकारच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारची यंत्रणा युद्धपातळीवर गाम करीत आहे. संबंधित यंत्रणेने सदर आजार कूपनलिका पाण्याच्या प्रभावाने झाला नसल्याचा अहवाल सादर केला आहे. मात्र नागरिकांनी याबाबत हरकत घेतली आहे. नागरिकांना गेल्या काही दिवसापासून भेडसावणाऱया आजाराचे मूळ कारण हे पाणीच आहे. सरकारने वेगवेगळय़ा प्रकारच्या पर्यायी उपाययोजना करण्यापेक्षा दाबोस पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी पुन्हा एकदा लावून धरली आहे.  

   सरकारी यंत्रणा खडबडून जागी

नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळपी गावात गेल्या काही दिवसापासून पोटदुखी, उलटी याचा प्रभाव वाढल्याने अनेक नागरिकांना वाळपईच्या सरकारी सामाजिक रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र सदर प्रकार पाहून सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून एका पथकाने शेळपी गावाला भेट दिली आहे. या मागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अजुनही यामागचे कारण सुस्पष्टपणे पुढे आलेले नाही. यासाठी सदर भागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या कूपनलिकेच्या पाण्याने त्रास होत असल्याच्या तक्रारी असल्याने सदर पाण्याचे नमूने गोळा करून तपासणीसाठी पाठवले होते.

वाळपईच्या पाणी पुरवठा खात्याने याची तपासणी केली असून या पाण्यात कोणत्याही प्रकारची बाधा नसल्याचे पाणी पुरवठा खात्याच्या अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे. मात्र याला नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सदर गावातील परिस्थितीची जाणीव करून घेण्यासाठी गावात फेरफटका मारला असता अनेक नागरिकांनी यास हरकत घेतली आहे.

दाबोस प्रकल्पातून पाणीपुरवठा करावा

गेल्या काही वर्षापासून सदर कूपनलिकेच्या पाण्याचा वापर नागरिक पिण्यासाठी करीत आहेत. मात्र काही वर्षापासून सदर पाणी गढूळ येत असल्याने पिण्यासाठी चांगले नाही. या पाण्यापासून आजार होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनेक वेळा सरकारी अधिकाऱयाना कळविले होते. मात्र याची कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. सदर पाणी या आजाराला कारणीभूत असल्याने आता सरकारने कूपनलिकेद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद करून दाबोस पाणी प्रकल्पातून करावा. याकडे वाळपईच्या आमदारांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

त्याचप्रमाणे गावात समाधानकारपणे पाण्याचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना नाल्याचे पाणी वापरावे लागत आहे. या नाल्याच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी नमूने गोळा करून नेण्यात आले आहेत.

सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा

वाळपई पाणीपुरवठा खात्याच्या माध्यमातून टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भर देण्यात आला आहे. सध्या दिवसाला दोन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र सरकार अशाच प्रकारे किती दिवस पाण्याचा पुरवठा करणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.

कूपनलिकेची दुरुस्ती

दरम्यान वाळपईच्या पाणीपुरवठा खात्याच्या यंत्रणेने सदर कूपनलिकेचे दूरुस्ती काम हाती घेतले आहे. कूपनलिकेचे जूने लोखंडी पाईप बदलून त्याजागी प्लास्टिक पाईप घालण्यात आले आहेत. त्यामुळे या पाण्यापासून कोणताही त्रास होणार नाही, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Related posts: