|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दिवाळीपर्वाची सुरमयी पहाट साजरी

दिवाळीपर्वाची सुरमयी पहाट साजरी 

प्रतिनिधी/ बेळगाव

दिपावलीच्या आनंदपर्वाची सुरमयी सुरुवात करणारा बहारदार कार्यक्रम रविवारी सादर करण्यात आला. आर्ट्स सर्कलतर्फे आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमामध्ये झालेल्या अनुराधा कुबेर यांच्या गायनाविष्काराने दिवाळीपर्वाचा आनंद द्विगुणित झाला.

या आगळय़ा सुरोत्सवाचे आयोजन येथील रामनाथ मंगल कार्यालयात करण्यात आले होते. पहाटेच्या गारव्यावेळी झालेली ही स्वरबरसात रसिकांच्या मनांना मोहवून गेली. सुरांच्या सजावटीने सादर झालेल्या या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी गायनरसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

अनुराधा कुबेर यांनी आपल्या गायनशैलीने रसिकांना तृप्त केले. मखमली आवाजातील कसदार गायकीचा आगळा पैलूच त्यांनी रसिकांसमोर उलगडला. आपल्या गायनाचा प्रारंभ त्यांनी भैरव रागातील विलंबित एकतालातील ‘बालमवा मोरे सैंया’ या बंदिशीने केली. त्यानंतर त्रितालातील ‘मेहेर दिन कीजे’ या बंदिशीचे सुरेल सादरीकरण केले.

अनया बिलावल रागामधील ‘ले तेरी लकरी’ ही बंदीश त्यांनी मध्यलय झपतालात सादर केली. दृत त्रितालात ‘मन हरवा’ ही बंदीश गाऊन रसिकांची मने जिंकली. गुजरी तोडीमधील रुपक तालात ‘देखो वृंदावन की गुंजन’ या बंदिशीला रसिकांची उत्तम दाद मिळाली. मध्यंतरानंतर राग भूपाल तोडीमध्ये विलंबित रुपक तालात ‘कनक निवाजे’ ही बंदीश सादर केली. दृत त्रितालातील ‘सुमरन नाम’ ही बंदीशदेखील रसिकांना भावली.

राग हिंडोल-बहार यांचा समन्वय साधत त्रितालामध्ये ‘पिया पिया करे जिया मोरा’ ही बंदीश गाऊन त्यांनी आपल्या अप्रतिम गायकीचे दर्शन घडविले. त्यांच्या ललत पंचम रागातील त्रितालामध्ये ‘अगना रसिक’ या बंदिशीने रसिकांची दिवाळी साजरी झाली.

भैरवीने सांगता करताना त्यांनी ‘तुमरे गुण अपार’ ही बंदीश सादर केली. मैफलीच्या प्रारंभी श्रीधर कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आर्ट्स सर्कलच्या अध्यक्षा लता कित्तूर यांनी अनुराधा कुबेर यांच्यासह अंगद देसाई (तबलावादक) आणि सौमित्र क्षीरसागर (संवादिनी वादक) यांचा सन्मान केला. मुपुंद गोरे यांनी आभार मानले. मध्यंतरामध्ये रसिक श्रोत्यांसाठी दिवाळी फराळाच्या आस्वादाचे आयोजन करण्यात आले होते.   

Related posts: