ग्रामीण मतदार आज देणार कौल

निवडणूक होणाऱया ग्रा. पं. 325
बिनविरोध सरपंच निवड 46
सरपंचपद निवडणूक– 279
एकूण सदस्य -2 हजार 661
बिनविरोध सदस्य निवड– 926
निवडणूक -1 हजार 735 जागांसाठी
जिल्हय़ात ग्रा. पं. साठी आज मतदान, 1,029 मतदान केंद्रे : 4 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी :
जिल्हय़ातील 325 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी 16 ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी 1 हजार 29 मतदान केंद्रावर 4 लाख 2 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक यंत्रणाही सज्ज झाली असून चार हजाराहून अधिक कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली असून नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर पहिलीच ग्रामपंचायत निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची आहे.
जिल्हय़ात 431 ग्रामपंचायती असून डिसेंबर 2017 पर्यंत मुदत संपणाऱया 325 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. सोमवारी 16 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया संपल्यावर सर्व मतदान यंत्रे सीलबंद करून संबंधित तहसीलदार कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी 17 रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
325 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत 46 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित 279 सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. तसेच 2 हजार 661 ग्रामपंचायत सदस्य निवडीपैकी 926 सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित 1 हजार 735 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 1 हजार 29 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे पोहोचली आहेत. मतदानासाठी 2 हजार 260 बॅलेट युनिट व 1 हजार 132 कंट्रोल युनिट तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर चार ते पाच निवडणूक कर्मचारी असे चार हजारांहून अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. मोठय़ा
ग्रामपंचायतींच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हय़ाबाहेरूनही पोलिसांची जादा कुमक दाखल झाली असून कुठेही अनूचित प्रकार घडल्यास तात्काळ त्या ठिकाणी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणली जाणार आहे.
निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी 20 तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेवेळीही सीसीटीव्ही कॅमेऱयांची नजर राहणार आहे. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यामार्फत गस्तही वाढविण्यात आली आहे.
राणेंची प्रतिष्ठा पणाला
भविष्यातील निवडणूका डोळय़ासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी वर्चस्वाची लढाई सुरू केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत आली आहे. विशेषकरून नारायण राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्ष स्थापन केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असल्याने त्यांच्या पक्षाच्या ‘समर्थ विकास पॅनेल’ला कितपत यश मिळते, यावरून त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी राहणार हेही ठरणार आहे. त्यामुळे राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.