|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रस्ता वाहून गेल्याने बाराशे लोकवस्तीचा संपर्क तुटला!

रस्ता वाहून गेल्याने बाराशे लोकवस्तीचा संपर्क तुटला! 

ढगफुटीसारख्या कोसळलेल्या पावसाने वीरमध्ये हाहाकार, तीन वर्षांपूर्वी अशीच ओढावली आपत्ती, रस्ता वाहून गेल्याने पाच कि. मी.ची करावी लागणार पायपीट

प्रतिनिधी /चिपळूण

येथून 45 कि. मी. अंतरावर असलेल्या वीर गावात तीन वर्षापूर्वी झालेल्या ढगफुटीत पुलासह रस्ता वाहून गेल्याची घटना घडलेली असतानाच रविवारी सायंकाळी कोसळलेल्या दीड-दोन तासांच्या तुफानी पावसात गावातील वरंडा घाटातील रस्ता पूर्णपणे खचला. त्यामुळे सुमारे सात वाडय़ांतील सुमारे 1200 लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे. यामुळे सरंक्षक भिंतीसह रस्ता पूर्णत्वास येईपर्यत पाच कि. मी.ची पायपीट येथील ग्रामस्थाना यापुढे करावी लागणार आहे.

तालुक्याच्या सीमेवर असलेल्या या दुर्गम गावांत तीन वर्षापूर्वी कोसळलेल्या सुमारे 350 मि. मी पावसामुळे ओढय़ावरील पूल व मुख्य रस्ता वाहून गेला होता. त्यातच घरांचेही मोठे नुकसान झाले होते. तसा काहीसा प्रकार रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झालेल्या पावसात झाला आहे. वहाळ ते वीर या सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता वाहून जाऊन मोठा खड्डा पडला आहे. त्याचबरोबर काहीठिकाणी डोंगरातील माती रस्त्यावर आली आहे. मार्ग बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. या पावसात पिकांचेही नुकसान झाले. पंचनाम्यानंतरच नुकसानीचा अंदाज येणार आहे.

सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येच्या या गावात पंधरा वाडय़ा आहेत. रविवारच्या पावसात वाहून गेलेल्या रस्त्यामुळे बंदरवाडी, तेलीवाडी, ब्राम्हणवाडी, भोईवाडी, मोगरेवाडी, घेवडेवाडी येथील सुमारे बाराशे लोकवस्तीला एस.टी. अथवा प्रवासी वाहतुकीसाठी पाच कि. मी.ची पायपीट करत लोहारवाडी येथे यावे लागणार आहे. या रस्त्याची डागडुजी करायची म्हटली तर संरक्षक भिंत बांधून माती, दगडाचा भराव करावा लागणार आहे. यासाठी मोठा कालखंड आणि आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यामुळे तात्काळ काम सुरू झाल्यास दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागणारा आहे.

दरम्यान, सोमवारी आमदार भास्कर जाधव, पंचायत समिती सभापती सौ. पूजा निकम यांनी सदर रस्त्याची पहाणी करत वाहतूक सुरू होण्याच्यादृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. निकिता सुर्वे, पंचायत समिती सदस्या सौ. संचिता केबंळे, पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश खापले, रवींद्र सुर्वे, रमेश रेपाळ, बांधकामचे उपअभियंता धामापूरकर तसेच नारायण दुर्गिले, दिलीप जाधव, दत्ताराम जावळे, दीपक जाधव, संतोष घेवडे, यशवंत दुर्गिले, विवेक जावळे, बारका जावळे, शशिकांत घेवडे आदी उपस्थित होते.