|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जिनपिंग पुन्हा अध्यक्ष होणे निश्चित

जिनपिंग पुन्हा अध्यक्ष होणे निश्चित 

पक्षाच्या घटनेत सामील होणार त्यांचे विचार :

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) 18 ऑक्टोबरपासून आपल्या 19 व्या नॅशनल काँग्रेसचे आयोजन करणार आहे. ही बैठक दर 5 वर्षांनी होते आणि यातून पक्षाला नवा नेता आणि देशाला नवा अध्यक्ष मिळतो. शी जिनपिंग पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होणे जवळपास निश्चित आहे. यावेळी सीपीसीमध्ये जिनपिंग यांचे पाठिराखे वाढले आहेत. अशा स्थितीत पक्ष घटनेत सुधारणा करून ‘शी जिनपिंग थॉट’ सामील करणार आहे.

जर असे झाले तर माओ आणि देंग जियाओ पिंग या नेत्यांच्या पंक्तीत जिनपिंग यांचा समावेश होईल. चीनमध्ये अजूनही मार्क्सिझम-लेनिनिझम, माओ थॉट, देंग जियाओ थ्येअरीचे अनुकरण केले जाते.

चीनमध्ये या बैठकीच्या अगोदर 11 ते 14 ऑक्टोबरपर्यंत सीपीसीच्या राष्ट्रीय समितीची बैठक पार पडली. यात जिनपिंग यांनी आपल्या अनेक समर्थकांना पक्षाच्या पदाधिकारीपदी नेमले. जिनपिंग 2012 मध्ये सत्तेत आले असून तेव्हापासून त्यांचे वर्चस्व चीनमध्ये खूपच वाढले. जिनपिंग यांना ‘कोर लीडर ऑफ चायना’ असा सन्मान मिळाला.

140 कोटींचा देश

सीपीसी नॅशनल काँग्रेसमध्ये महासचिवाची निवड करते. तर जगाच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या (1.40 अब्ज) देशाची धुरा महासचिवच सांभाळतो. सीपीसीमध्ये एकूण 2300 प्रतिनिधी असून यावेळी 2287 प्रतिनिधीच परिषदेत सहभागी होतील. 13 प्रतिनिधींची हकालपट्टी करण्यात आली. सीपीसीच्या केंद्रीय समितीत 200 सदस्य असतात, ही समितीच पॉलिट ब्यूरो निवडते. याद्वारे स्थायी समितीची निवड केली जाते. पॉलिट ब्यूरोमध्ये 24 तर स्थायी समितीत 7 सदस्य असतात. या दोन्ही समित्यांकडे सर्वाधिक अधिकार असतात.

कमी वयाच्या नेत्यांना प्राधान्य

19 व्या नॅशनल काँग्रेसमध्ये जिनपिंग पुढील 5 वर्षांसाठी चिनी धोरणाची दिशा आणि दशा याबाबत अहवाल मांडतील. पॉलिट ब्यूरो आणि स्थायी समितीत नव्या लोकांचा समावेश होण्याची चिन्हे आहेत. सीपीसीत भविष्याच्या नेत्याला स्थान मिळेल अशी अपेक्षा आहे. सीपीसीने महत्त्वाच्या पदांसाठी वयोमर्यादा निर्धारित केली आहे. अशा स्थितीत पॉलिट ब्यूरोतील बहुतेक सदस्य हटविले जातील, कारण बहुतेकांनी वयाची 68 वर्षे पार केली आहेत. यात भ्रष्टाचारविरोधी यंत्रणेचे प्रमुख वाँग किशान देखील सामील आहेत. परंतु वाँग हे जिनपिंग यांचे प्रमुख सहकारी असल्याने त्यांना पदावर कायम ठेवले जाऊ शकते.

5 वर्षात 10 लाखांवर कारवाई

जिनपिंग यांनी 5 वर्षांपासून भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबविली असून यात 10 लाख भ्रष्ट अधिकाऱयांवर कारवाई करण्यात आली. ‘शी’ नावाने चीनमध्ये एक आंदोलन देखील झाले, ज्यामुळे जिनपिंग यांच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली. आंतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण चीन समुद्राचा विस्तार आणि वन बेल्ट वन रोड हे दोन मुद्दे जिनपिंग यांच्यासाठी यशस्वी ठरले. त्यांच्या नेतृत्वाखाली चीनने जगासमोर स्वतःला पर्यायी महासत्ता म्हणून सादर केले.

68 वर्षांपासून कम्युनिस्ट सत्तेत

कम्युनिस्ट पक्ष चीनमध्ये 68 वर्षांपासून सत्तेत आहे. पक्षाने अनेक उतारचढाव अनुभवले असून त्याच्या सामर्थ्यात सातत्याने वाढ झाली.

पहिली काँग्रेस : 1921 मध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने बीजिंगमध्ये पार पडली,  यात कम्युनिस्ट नेते माओ त्सेतुंग उपस्थित होते.

माओ झाले नेता : 7 वी काँग्रेस 1945 मध्ये चीन-जपान युद्ध संपताना आयोजित झाली. कम्युनिस्ट पक्षाचा गड असणाऱया यनानमध्ये बैठक झाली. यात माओ सर्वोच्च नेते म्हणून उदयास आले. याच काँग्रेसमध्ये माओंच्या विचारांना पक्षाच्या विचारधारेचा पाया ठरविण्यात आले.

सांस्कृतिक क्रांती : 9 वी नॅशनल काँग्रेस 1969 मध्ये झाली. त्याकाळात चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीने जोर पकडला होता. सत्तेवरील पकड घट्ट करण्यासाठी माओने या क्रांतीचा वापर केला.

चिनी समाजवाद : 1982 मध्ये 12 वी काँग्रेस पार पडली. यात चिनी नेते तंग शियाओफिंगने चिनी समाजवादाचा प्रस्ताव मांडला. यामुळे चीनमध्ये आर्थिक सुधारणांचा मार्ग तयार झाला. देश पूर्णपणे कम्युनिस्ट विचारधारेकडून भांडवलवादाच्या दिशेने वळला.

भांडवलवाद्यांना स्थान : 2002 मध्ये 16 वी काँग्रेस झाली, यात अधिकृतपणे छोटय़ा उद्योजकांना पक्षाचा सदस्य होण्याची अनुमती मिळाली.