|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » निवडणुकीच्या रागातून ओमनीच्या काचा फोडल्या

निवडणुकीच्या रागातून ओमनीच्या काचा फोडल्या 

वार्ताहर/ कुडाळ

 मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब याच्यासह आठजणांनी भोईचे केरवडेचे उपसरपंच व राणे समर्थक राजन उर्फ राजू महादेव मल्हार यांच्या मारुती ओमनीचा पाठलाग करून अडवून लोखंडी शिगेनी ओमनीच्या काचा व हेडलाईट फोडल्याची घटना भोईचे केरवडे-मळेवाडी येथे रविवारी मध्यरात्री 1.25 च्या सुमारास घडली. याबाबत मल्हार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय वादातून ही घटना घडली आहे. या घटनेने निवडणुकीला गालबोट लागले.

 दरम्यान, कुडाळ पोलिसांनी संशयित धीरज परब (33, रा. पिंगुळी) याच्यासह विवेक विजयानंद परब (26), विनित विजयानंद परब (27), सुशांत सूर्यकांत परब (32), संतोष मधुकर परब (31), सुबोध सूर्यकांत परब (25), सिद्धेश नारायण परब (25) व सचिन राघो ठाकुर (38, सर्व रा. भोईचे केरवडे) यांना सोमवारी दुपारी ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली. नंतर त्यांची सायंकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली.

 मल्हार यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काल रात्री ते आपल्या ताब्यातील मारुती ओमनीने कुडाळहून भोईचे केरवडे येथे जात होते. त्यांच्यासोबत गावातील बाबू उर्फ बाळकृष्ण सावंत होते. भोईचे केरवडे-जाधववाडी मोरीवर पावसामुळे पुराचे पाणी आले होते. त्यामुळे तेथे घरी जाण्यासाठी गावातील श्रावण अशोक बांदेकर व सचिन गुणाजी परब थांबले होते. त्यांना घरी सोडण्यासाठी ते आपल्या ओमनीमध्ये घेऊन मांडकुली-तुळसुली मार्गे जाण्यास निघाले. त्याचवेळी त्यांच्या ओमनीला सचिन ठाकुर हा मारुती ओमनी घेऊन ओव्हरटेक करून गेला.

 ओमनीच्या काचा व हेडलाईट फोडून नुकसान

 तेथून दोन ते तीन किमी अंतरावर मल्हार ओमनीने गेले असता, समोरून एक स्विफ्ट डिझायर कार आली व ती त्यांच्या ओमनीच्या समोर आणून पुढे निघून गेली. आपल्या ओमनीतील सचिन परब व श्रावण बांदेकर यांना बोडदेवाडी येथे सोडून ते घरी जाण्यासाठी ओमनी वळवून निघत असताना सुबोध परब व सिद्धेश परब हे मोटारसायकलने आले आणि सिद्धेश याने आपल्या हातातील लोखंडी शिगेने ओमनीची समोरील काच फोडली. त्यानंतर धीरज परब, विवेक परब, विनित परब, सुशांत परब व संतोष परब हे स्विफ्ट डिझायर व दुचाकीने तेथे आले. त्यांनी लोखंडी शिगेने ओमनीच्या सर्व बाजूच्या काचा फोडल्या. तसेच ओमनीचा पत्रा व हेडलाईट फोडून नुकसान केले. ‘तू उद्या ग्रामपंचायतीकडे दिसलास तर याद राख’, अशी धमकीही त्यांना दिली.

 या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 147, 143, 148, 149, 323, 504, 506, 341, 427 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) 135 प्रमाणे धीरज परब याच्यासह आठहीजणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. या सर्वांची सायंकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. जी. बाकारे करीत आहेत.

             तिघांवर 151 प्रमाणे कारवाई

 17 ऑक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया असल्याने संशयित धीरज परब, विवेक परब व विनित परब या तिघांवर सीपीआर 151 प्रमाणे कारवाई करण्यग्नात येणार आहे, असे बाकारे यांनी सांगितले.