|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ग्रा. पं. निकाल राजकीय नेत्यांना जागा दाखवणारे

ग्रा. पं. निकाल राजकीय नेत्यांना जागा दाखवणारे 

ग्रामपंचायत निकाल सर्वच राजकीय पक्षांना त्यांचे ठिकाण दाखवून देणारे ठरले आहेत. कोकणातील कोणत्याही विभागात भाजपचे सरपंच सर्वाधिक संख्येने निवडून आले नसले तरी प्रत्येक विभागात भाजपने गेल्या कामगिरीपेक्षा सरस कामगिरी केल्याचे चित्र आहे.

 

नगराध्यक्षांप्रमाणेच सरपंच निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय प्रगत नागरिकशास्त्राच्या सिद्धांताप्रमाणे घेण्यात आला असला तरी त्याचे राजकीय पैलू कमी नाहीत. राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला त्याचा फायदा व्हावा हा पोटातील हेतू नगर परिषदांप्रमाणे कोकणात ग्रामपंचायतींमध्येदेखील यशस्वी झाल्याचे चित्र आहे. अर्थात कोकणातील कोणत्याही विभागात भाजपचे सरपंच सर्वाधिक संख्येने निवडून आले नसले तरी प्रत्येक विभागात भाजपने गेल्या कामगिरीपेक्षा सरस कामगिरी केल्याचे चित्र आहे.

सिंधुदुर्ग जिह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीला वेगळे परिमाण लाभले होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेस सोडून स्वतंत्र्य पक्ष काढला. त्यांचे सर्वाधिक समर्थक सिंधुदुर्गात आहेत. नव्या पक्षाची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर लढवल्या जात नसल्याने समर्थ विकास पॅनेल नावाचे पॅनेल राणे समर्थकांनी प्रत्येक गावात तयार केले. या पॅनलतर्फे राणे समर्थक या निवडणुकीत लढले.

सिंधुदुर्ग जिह्यात 325 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्यामध्ये सावंतवाडी, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी या ठिकाणी समर्थ विकास पॅनेलला चांगले यश मिळाले. सुमारे 150 ग्रामपंचायतींचे सरपंच समर्थ पॅनेलकडे आले असल्याचा दावा करण्यात येत आहे. या पॅनेलला कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, सिंधुदुर्गातील 90 टक्के ग्रामपंचायतींवर समर्थ विकास पॅनेलची सत्ता येईल. तथापि, निवडणूक निकालातून मात्र तसे घडल्याचे दिसून येत नाही. या निकालाने सिंधुदुर्ग जिह्यात समर्थ पॅनेलचे सर्वाधिक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडून आले असल्याचे चित्र असले तरी 50 टक्केहून अधिक ग्रामपंचायती समर्थ पॅनेलच्या ताब्यात आल्या असे म्हणणे धाडसाचे ठरेल. समर्थ पॅनेलला कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्गमध्ये अपेक्षित यश मिळू शकले नाही. सिंधुदुर्ग जि. प.च्या अध्यक्षा रेश्मा सावंत यांचे माजगाव हे गाव आहे. या गावाची सत्ता शिवसेनेकडे गेली आहे. त्यामागे विक्रांत सावंत यांचे परिश्रम असल्याचे सांगण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर राणे समर्थकांची सत्ता आहे. असे असताना अध्यक्षांच्या गावची ग्रा.पं. राणे समर्थकांकडे राहिल अशी अपेक्षा व्यक्त होत होती.

सिंधुदुर्गात शिवसेनेला मनाजोगे यश मिळवता आलेले नाही. या जिह्यात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि राज्यमंत्री व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री दीपक केसरकर हे पक्षासाठी कार्यरत आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून केसरकर हे निवडून येतात. या मतदारसंघातील कामगिरी ही केसरकरांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. सावंतवाडी तालुक्यात 52 ग्रामपंचायतीपैकी 24 ग्रामपंचायती राणे समर्थक असलेल्या समर्थ विकास पॅनेलने जिंकल्या आहेत. भाजपकडे थोडय़ा-थोडक्या नव्हे तर 13 ग्रामपंचायती गेल्या आहेत. शिवसेनेकडे 6, गाव पॅनेलला 8 तर राष्ट्रवादीला एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागेल आहे. राज्यमंत्री व सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री म्हणून लागलेले निकाल हा त्यांना बसलेला जबर राजकीय धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचे मालवण तालुक्यातील तळगाव हे मूळ गाव होय. त्या गावात शिवसेनेची सत्ता आली. तथापि, बाकी मालवण तालुक्यात म्हणावी तशी शिवसेनेला झेप घेता आली नाही. भाजपने सिंधुदुर्ग जिह्यात अपेक्षेपेक्षा जास्त यश प्राप्त केल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या जिह्यात 60-70 ग्रामपंचायती भाजपने आपल्या ताब्यात ठेवल्या असाव्यात असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दोडामार्गसारख्या ठिकाणी भाजपचे परंपरागत बलस्थान असले तरी सावंतवाडी तालुक्यात 13 ग्रामपंचायती खिशात टाकण्यापर्यंत या पक्षाने मारलेली मजल ही अन्य पक्षांसाठी विशेष लक्षणीय ठरली आहे. सिंधुदुर्ग जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी माजी आमदार आणि भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार हे कार्यरत होते. याशिवाय माजी आमदार राजन तेली हेही कार्यरत होते. कणकवली देवगड या प्रमोद जठार यांच्या आमदारकीच्या उमेदवारीच्या कार्यक्षेत्रात भाजपचे यश मर्यादित आहे. त्या मानाने माजी आमदार राजन तेली यांनी विशेष लक्ष घातलेल्या सावंतवाडी तालुक्यात पक्षाला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे जठारांपेक्षा तेलींच्या रणनीतीला अधिक यश मिळाल्याचे चित्र उभे राहिले आहे.

रत्नागिरी जिह्यात 215 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. या निवडणुकांमध्ये विविध राजकीय पक्षांनी आपले सामर्थ्य पणास लावले होते. रत्नागिरी जिह्यात कोठेही समर्थ विकास पॅनेल या राणे समर्थ पॅनेलने निवडणुका लढल्याचे चित्र नव्हते. राणे समर्थकांनी सध्या रत्नागिरी जिह्यात थंडे धोरण स्वीकारले आहे. रत्नागिरी जिह्यात भाजपने 47 ग्रामपंचायतींचे सरपंच निवडून आणण्यात यश मिळवले असून आणखी 12 ते 13 सरपंच लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा त्या पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी केला आहे. भाजपच्या ताकदीमध्ये तिपटीची वाढ झाली आहे. सर्वाधिक जागा संगमेश्वर तालुक्यात मिळाल्याचा दावा त्या पक्षाचे संगमेश्वर तालुका प्रभारी सचिन वहाळकर यांनी केला आहे. 13 ग्रामपंचायती एकटय़ा संगमेश्वर तालुक्यात निवडल्या गेल्याचाही दावा त्या पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत.

रत्नागिरी जिह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. सुमारे 100 ते 125 ग्रामपंचायतींवर या पक्षाने झेंडा फडकवला आहे. आमदार राजन साळवी, उदय सामंत, सदानंद चव्हाण या शिवसेनेच्या शिलेदारांनी जोरदार प्रयत्न करून आपापल्या तालुक्यात वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केला. काँगेस पक्षाचे अस्तित्व रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिह्यात आता बारकाईने शोधावे लागत आहे. राणेंच्या कृतीमुळे दोन्ही जिह्यातून काँग्रेस पुसली गेल्याचे चित्र असून आमदार भास्कर जाधव, संजय कदम आणि राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे गुहागर, चिपळूण, दापोलीमध्ये राष्ट्रवादीसाठी आशादायक चित्र राहिले आहे. एकूणच ग्रामपंचायत निकाल सर्वच राजकीय पक्षांना त्यांचे ठिकाण दाखवून देणारे ठरले आहेत.

Related posts: