|Saturday, May 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बळीचे राज्य कधी ?

बळीचे राज्य कधी ? 

बलिप्रतिपदेचा सण आज सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. भारतीय पौराणिक कथासूत्रानुसार पृथ्वीतलावरती एकेकाळी महाबळीचे राज्य होते. त्याने आपल्या कर्तृत्वाने देवादिकांना पराभूत करून म्हणे आपली सत्ता प्रस्थापित केली होती. अत्यंत प्रजाहितदक्ष आणि कृषकांच्या कल्याणाकरिता राब राब राबणारा हा राजा भारतीय संस्कृतीत वंदनीय ठरलेला असून दक्षिणेतल्या केरळसारख्या राज्यातला ‘ओणम सण’ जसा पृथ्वीतलावरच्या बळीराजाच्या पुनर्आगमनाप्रीत्यर्थ साजरा केला जातो, त्याचप्रमाणे विक्रम संवत कालगणनेतला पहिल्या महिन्यातला पहिला दिवस ‘नववर्षदिन’ म्हणून साजरा केला जातो. शरद ऋतूतल्या आश्विन अमावास्येनंतर येणाऱया कार्तिकातल्या पहिल्या दिवसाला शेतकरी समाजात विशेष महत्त्वाचे स्थान प्रदान करण्यात आलेले आहे. गोव्यातल्या काणकोण, सांगेसारख्या जंगलसमृद्ध गावांमध्ये पार्वतीपुत्र कार्तिकेयाप्रीत्यर्थ दसरा ते दिवाळीतल्या बलिप्रतिपदेपर्यंत आदिवासी वेळीप जमातीतर्फे ‘धिल्ल्या’च्या मातीच्या गोळय़ाला फुलांनी सजवून लोकगीतांच्या गायनाने त्याची पूजा केली जाते. तिसवाडी, फोंडा आदी भागातील गावडा जमात बालकृष्णाच्या प्रतिमेला गुढय़ा-पताक्यांनी सजवलेल्या लाकडी पेटाऱयात अथवा पालखीसदृश कलाकृतीत स्थापना करून ‘धेणल्याची’ मिरवणूक उत्साहात काढतात. बलिप्रतिपदेचा हा दिवस शेतकरी जातीजमात गाईच्या शेणाद्वारे गोठय़ाची प्रतिकृती साकारून त्यात कारिटांची गुरेढोरे आणि प्रतिकात्मक गुराखी स्थानापन्न करून, गुरा-ढोरांची पूजा करून त्यांना गोडधोड अर्पण करून ‘गुरांचा पाडवा’ म्हणून साजरा करतात.

गोवा-कोकणातल्या बलिप्रतिपदेच्या सणात वारूळाची माती, गाईचे शेण यांना खूपच महत्त्व दिलेले आहे. त्याच्यातल्या सृजनतत्त्वाचा साक्षात्कार इथल्या शेतकरी जाती-जमातीला झाला होता आणि त्यासाठी त्यांनी धनधान्यांच्या पैदासीला कारण असणाऱया वारूळातल्या मातीपासून, त्याचप्रमाणे शेणापासून तयार केलेल्या गोठय़ाला मोसमी फुलांनी सजवून, पूजण्यात धन्यता मानली. आज भारतीय शेतकऱयांना गायी-गुरांचे शेण, त्याचप्रमाणे मूत्राच्या औषधी तत्वांपासून दूर नेण्यात देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तास्थानी आलेली सरकारे आणि त्यांना सत्तेत आणण्यासाठी सफल ठरलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हस्तकांबरोबरच आपलीही मानसिकता कारणीभूत ठरलेली आहे. त्यामुळे अती धान्य पैदासीसाठी रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके यांच्या अतिरेकी वापराची कास आपल्या शेतकरी समाजाने धरावी असे वातावरण निर्माण करण्यात आलेले आहे. भारताला अन्नधान्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करावे म्हणून देशाच्या स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती झाली. एकेकाळी येथील मोसमी निसर्गचक्राचा विचार करून, मातीचे गुणधर्म यांचा अभ्यास करून कार्यान्वित असलेली पारंपरिक शेती आणि तिचे तंत्रज्ञान तकलादू ठरवण्यात आले. त्यामुळे बाजारपेठेवरती लक्ष ठेवून भात आणि अन्य नगदी पिकांची पैदास शेतकऱयांनी करावी म्हणून आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे विकसित ज्यादा पिके देणाऱया धान्यांच्या सुधारित बियाणांच्या प्रजातीबरोबर रासायनिक खते, कीटकनाशके, तृणनाशके आणि विषारी जंतुनाशकांच्या वापराला राजाश्रय लाभला. त्यामुळे निसर्ग आणि पर्यावरणाचा विचार करून कार्यान्वित असलेली सम्यक शेतीची परंपरा विस्मृतीत गेली.

‘सम्यक विकास’ मध्ये दिलीप कुलकर्णी म्हणतात, भारतीय शेतकरी कार्यतत्पर बैलावर पुत्रवत प्रेम करतो. बेंदराच्या दिवशी त्याला सजवून त्याची पूजा करतो. यात आश्चर्य नाही! अशीच पूजा ‘वसुबारस’ला गाईची करतात. भारतीय संस्कृतीत सर्वात जास्त महत्त्व गायीला दिले गेलेले आहे. कारण ती दूध देते, शेण देते, मूत्र देते आणि पाडसाच्या रूपाने बैलही देते. माणसाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अन्नाचा जणू तो एक चालता स्रोतच आहे. इतक्या ‘उपयुक्त पशु’ ला भारतीयांनी देवत्व बहाल न केले तरच नवल! आज आपणाला जुन्याचा किंवा नव्याचा अविवेकी त्याग किंवा स्वीकार हे दोन्ही टाळून शेती आणि शेतीवर आधारित उद्योग, व्यवसायांना ऊर्जा देणे शक्य आहे, परंतु आज आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आपण अविवेकी वापर करण्यावर भर दिल्याने रासायनिक खतांच्या वारेमाप वापराने सोन्यासारख्या शेणाकडे, त्याच्यापासून निर्माण होणाऱया उत्तम अशा शेणखताकडे मात्र दुर्लक्ष केले आणि रासायनिक कीटकनाशकांच्या आगमनानंतर उत्तम कीटकनाशक असणाऱया गोमूत्राकडे मागासलेपणा म्हणून पहायला सुरुवात झाली. ‘मर्क्युरी क्लोराईड’ हे फार पूर्वीपासून प्रभावी जंतुनाशक म्हणून वापरण्यात यायचे. डाळी, गहू दीर्घकाळ टिकावेत म्हणून पूर्वी मर्क्युरी म्हणजे पाऱयाचे संयुग असलेल्या गोळय़ा वापरात होत्या. कीटकनाशके, जंतुनाशके, बी-बियाणे टिकविण्यास त्याचप्रमाणे बॅटरीच्या सेलसाठी पाऱयाचा उपयोग चालू आहे. धान्ये, डाळी यांच्या पिकांच्या रक्षणासाठी मेथील मर्क्युरीची फवारणी करत. हे धान्य खाल्ल्याने 1980 च्या दशकात जपानमधील मिनामाटा किनारी राहणाऱया असंख्य जणांना ते पाऱयाचे विष मृत्यूदारी घेऊन गेले होते. 1999 मध्ये ‘पारा आणि घातक आत्ममग्नता’ यातला दृढसंबंध समोर आल्याने जग हादरले होते. कृत्रिम कीटकनाशकांमध्ये शिसे, आर्सेनिक, पारा यासारख्या विषारी धातूंचा वापर केल्याने माणूस व जनावरांचे खाद्यान्न दूषित झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. काही कीटकनाशकांचा कडक उन्हाच्या सान्निध्यात थोडय़ा प्रमाणातही त्वचेशी संपर्क आला तरी खाज सुटणे, डोळे चुरचुरणे, त्वचेवर पुरळ येणे, त्वचेला भेगा पडणे, भूक मंदावणे, पोटदुखी, जुलाब अशी लक्षणे दिसून आलेली आहेत. कित्येक वेळा रसायने, कीटकनाशके यांचे अंश पाण्याबरोबर वाहून जाऊन मासे वा जैविक पदार्थ प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. अनेक कीटकनाशके अशी आहेत जी ऊन, पाऊस, वारा अशा नैसर्गिक घटकांचा परिणाम होऊनही नष्ट होत नाहीत आणि ती मानवी शरीरात प्रवेश करून यकृताच्या कर्करोगास कारणीभूत ठरतात. हल्लीच  कीटकनाशकांच्या विषारी घटकांशी संपर्कात आल्याने महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्हय़ातल्या 21 शेतकऱयांना आपले प्राण गमवावे लागले. देशभर अशी घातक कीटकनाशके अविवेकी वृत्तीने वापरली जात असल्याने ‘महाराष्ट्र सरकारच्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी  39 शेतकऱयांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या कीटकनाशकांच्या फवारणीस बहुराष्ट्रीय कंपन्यांना जबाबदार धरलेले आहे. आज आपल्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारा कृषक समाज रासायनिक खते, कीटकनाशके, तृणनाशके आदींच्या अविवेकी वापरामुळे संकटग्रस्त आहे. एका बाजूला लहरी पाऊस, हवामान बदलाचे संकट तर दुसऱया बाजूला जहरी रसायनांचा शेतीत वापर यामुळे बळीराजा संत्रस्त आहे. शेतकऱयांच्या वाढत्या आत्महत्या आणि वाढते नैराश्य थोपवण्यासाठी आपल्या देशात आशावादी वातावरण कधी निर्माण होईल? बळीराजाच्या जीवनाला स्थैर्य, सशक्तपणा हे केवळ मृगजळच ठरणार आहे काय?

Related posts: