|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जसा गंगाजळाचा प्रवाह

जसा गंगाजळाचा प्रवाह 

श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला पुढे म्हणतात –

जो आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु ।

जैसा प्रवाहो अनुस्य़तु । गंगाजळाचा ।।

तें आदि नाहीं खंडलें ।

समुद्रीं तरी असे मीनलें ।

आणि जातचि मघ्यें उरलें । दिसे जैसें ।

इयें तिन्ही तयापरी । सरसींच सदा अवधारिं ।

भूतांसी कवणीं अवसरिं । ठाकती ना ।

म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें ।

जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ।

भगवान म्हणतात-अर्जुना! तुला मी सांगितलेलं आत्म्याचं अमरत्वाचं तत्त्व पटत नाही का? हे सर्वजण मर्त्य आहेत, ह्यांचा शेवट हा आहेच असं जरी तुला वाटत असलं तरीही तुला शोक करण्याचं काही कारण नाही. तत्त्वज्ञान काहीही असो, आपला अनुभव हाच आपल्याला आधार वाटतो. जीवन हे अनुभवाच्या वाटेनं चालतं हे जाणून भगवान अर्जुनाला पुढे उपदेश करीत आहेत, तो असा-प्रत्येक माणूस मर्त्य आहे असं जरी धरलं तरी तू शोक का करावास हे कळत नाही. प्रत्येकजण जर मरणारच आणि हे जर अटळ असेल, मृत्यूचा परिहार जर कशानेही होणार नसेल, मृत्यू टाळण्यासाठी कोणताही उपाय नसेल तर शोक कशासाठी करायचा? शोक करून काय मिळणार आहे? गंगाजलाचा प्रवाह जसा अखंड आहे त्याप्रमाणे हा जीवनाचा प्रवाहही सातत्याने चालणारा आहे. गंगाजलाचा प्रवाह अखंड आहे म्हणजे काय? त्या ओघातील पाणी कायम तेच आहे काय? त्या ओघातील पाण्याचा प्रत्येक थेंब वहात आलेला असतो आणि समुद्राला मिळेपर्यंत तो स्वतःच वहात राहणार आहे. गंगेच्या मुखाजवळ प्रत्येक थेंब समुद्रात मिळत असतो. एक थेंब जातो त्याची जागा दुसरा थेंब घेतो. तो जातो तेव्हा त्याची जागा तिसरा थेंब घेतो. असं हे कर्म अहोरात्र तीन त्रिकाळ, बारा महिने, हजारो वर्षे चाललेलं आहे. पाणी सततच बदलत असतं. उगमातून सतत येत असतं आणि समुद्राला सतत मिळत असतं. पाणी जरी जात येत असलं तरी प्रवाह मात्र अखंड असतो.

त्याप्रमाणेच ह्या जगात प्राणी जन्माला येतो, राहतो व जातो म्हणजे मरतो. अशा प्रकारे प्राणी सातत्यानं जन्माला येत आहेत आणि मृत्यूच्या दाराने जातही आहेत. तरीही जीवनाचा प्रवाह अखंडित चालू आहे. जग उजाड, जीवनरहित कधीच झालं नाही व होणारही नाही. जगातील जीवनाचा ओघ हा अशा तऱहेचा आहे. हा सृष्टीक्रम आहे. अर्जुना! हा सृष्टीक्रम तुला, मला अगर कोणालाही बदलता येणार नाही. ही निसर्गदत्त अशी एक प्रक्रिया आहे. ह्याला आवर घालणं कोणालाही शक्मय नाही. ह्या अपरिहार्य नैसर्गिक घटनेतील घडामोडींबद्दल तुला शोक करण्याचं काय कारण आहे बरं!

ना तरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना ।

जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ।

तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं ।

हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ।

Related posts: