|Saturday, October 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बलिप्रतिपदा ऊर्फ पाडवा

बलिप्रतिपदा ऊर्फ पाडवा 

वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन झाले की आश्विन सरतो. कार्तिक महिन्यातला पहिला दिवस म्हणजे बलिप्रतिपदा ऊर्फ पाडवा. पूर्वी आपल्याकडे याच दिवशी नवे संवत्सर सुरू होई. पाडव्यापासून मार्गशीर्ष सरेतो ग्रामीण भागात उत्सवाचे वातावरण असे. या काळात सुगीची कामे उरकलेली असत, शेतकरी राजावरचा कामांचा ताण थोडा कमी झालेला असे. बारा बलुतेदारांनी आपापले उत्पादन सादर केलेले असे. तुळशीचे लग्न, त्रिपुरी पौर्णिमा, स्थानिक जत्रा आदि उत्सवात गावकरी आपले मन रिझवीत. 

बलिप्रतिपदेच्या कथेत विष्णूने वामनावतार घेतला आणि बळीराजाला तीन पावले जमीन दानात मागितली. बळीराजाने हे दान कबूल केल्यावर एका पावलात पृथ्वी आणि दुसऱया पावलात आकाश व्यापून तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्मयावर ठेवले आणि त्याला पाताळात ढकलले. सप्तपाताळात गेल्यावर बळीराजाने तिथे कृषीसंस्कृती विकसित केली. तो जनतेत अतिशय लोकप्रिय झाला. पुराणांमधील उल्लेखानुसार या कथेतील सप्तपाताळ म्हणजे भुजपासून केरळ-कन्याकुमारीपर्यंतचा प्रदेश असे मानतात. दक्षिण भारतात ओणम हा सण साजरा करतात तेव्हा बळीराजा प्रजेला भेटायला येतो आणि दर्शन देतो अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. आपल्याकडे देखील लोकसाहित्यात ‘इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना आढळते.

आताच्या युगात शेतकऱयांना नुसते उत्पादन झाल्यावर सुखाची झोप मिळते असे नाही. किंबहुना ती झोप हरवलेली आहे. उत्पादन कमी झाले तर दुष्काळ आणि जास्त झाले तर मालाचे भाव इतके पडणे की केलेला खर्च किंवा काढलेले कर्ज फिटण्याइतके देखील द्रव्य मिळू न शकणे. नव्या जगातील मार्केटिंगशी शेतकऱयाचा सूर नेमका जुळलेला नाही. लोकशाहीत दर पाच वर्षांनी किंवा कमी कालावधीत देखील राज्यकर्ते बदलत राहतात. कधी कधी फक्त राजकीय पक्षाचे नाव बदलते आणि खुर्चीवरची माणसे तीच राहतात. इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो ही प्रार्थना नियंता ऐकत
नाही.

पाडव्याच्या दिवशी नव्या वर्षाचे स्वागत करताना, संध्याकाळी औक्षण करून घेताना, गोडधोड खाताना आणि सग्यासोयऱयांना, इष्टमित्रांना सुखसमृद्धीच्या शुभेच्छा देताना आपल्या सर्वांच्या मनात या बळीराजाचे स्मरण राहो, आज नाही तर उद्या केव्हातरी त्याला अभिप्रेत असलेले बळीचे राज्य येवो, आपल्या सुखसमृद्धीच्या पंगतीत आपल्या शेजारी त्याचा देखील पाट सन्मानाने मांडला जावो.

Related posts: