|Thursday, January 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नवी संधी

नवी संधी 

दोन देशांमधील मैत्री ही एकमेकांच्या आवश्यकता आणि परस्पर उपयुक्तता यावर अवलंबून असते, असे तत्त्व आहे. साध्या शब्दात सांगायचे तर ती कोणतेही तत्त्वज्ञान किंवा आदर्शवाद यावर आधारित नसून केवळ व्यवहाराच्या पायावर उभी असते. या आवश्यकता आणि उपयुक्तता परिस्थितीनुसार बदलतात आणि त्यानुसार हे संबंधही बदलतात. त्यामुळे ज्यावेळी संधी असते तेव्हा तिचा लाभ उठविण्याचा प्रयत्न करणे ही खरी मुत्सद्देगिरी असते. सध्याच्या काळात जगात, विशेषतः भारताच्या अवतीभोवतीच्या जगात एक वेगळय़ा प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतासाठी ही एक संधी आहे आणि तिचा लाभ उठवायला हवा. हे वातावरण असे आहे की, भारताच्या उत्तरेचा शेजारी चीनची शक्ती भरमसाठ वाढली असून त्याबरोबरच त्याची प्रादेशिक महत्त्वाकांक्षाही वाढली आहे. दुसरीकडे भारताच्या वायव्येचा शेजारी पाकिस्तान त्याने स्वतःच लावलेल्या दहशतवादाच्या आगीचे चटके सोसत आहे, तसेच जगालाही सोसायला लावत आहे. यामुळे विश्वसमुदाय, आणि अमेरिका व युरोपातील प्रमुख राष्ट्रे या दोन्ही देशांकडे संशयाच्या दृष्टीने पाहू लागली आहेत. चीनच्या वाढत्या विस्तारवादी आणि वर्चस्ववादी महत्त्वाकांक्षेमुळे त्याच्या आजूबाजूची जपान, व्हिएतनाम इतकेच नव्हे तर दूरची फिलिपाईन्स आणि ऑस्ट्रेलियासारखी राष्ट्रेही सावध झाली आहेत. भारताला तर चीनसंबंधी नेहमीच दक्षता बाळगावी लागते. पाकिस्तानचे बोलायचे, तर दहशतवाद हा त्याच्या राजकीय धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्याप्रमाणे त्याची वर्तणूक आहे. जोपर्यंत या दहशतवादाचे लक्ष्य केवळ भारत होता, तोपर्यंत त्याचे गांभीर्य इतर देशांनी फारसे मनावर घेतले नव्हते. पण आता पाकमध्ये उगवलेली आणि फोफावलेली ही दहशतवादाची विषवल्ली सगळय़ा जगाला त्रासदायक ठरत आहे. जगात कोठेही दहशतवादी हिंसाचार झाला, तर त्याचे धागेदोरे कोणत्या ना कोणत्या मार्गाने, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षतणे पाकिस्तानपर्यंत येऊन ठेपतात. पाकचा हा दहशतवाद केवळ इस्लामी स्वरूपाचा आहे, असे नाही. तो आण्विक स्वरूपाचाही आहे. पाकने स्वतः चोरून मिळविलेले अण्वस्त्र तंत्रज्ञान उत्तर कोरियासारख्या उपद्रवी देशांनाही चोरून विकले आहे आणि जगाला संभाव्य अणुयुद्धाच्या सीमेपर्यंत आणण्याची मुजोरी दाखविली आहे, असे अनेक अभ्यासकांचे स्पष्ट मत आहे. या दोन्ही देशांपेक्षा भारताची वर्तणूक वेगळी आहे. भारतही सैनिकीदृष्टय़ा सामर्थ्यसंपन्न देश आहे. तरीही त्याने कधीही या सामर्थ्याचा उपयोग कमजोर राष्ट्रांचे दमन करण्यासाठी केलेला नाही. तसेच भारत स्वतः पाकपुरस्कृत दहशतवादाचा बळी असूनही त्याने त्याच मार्गाने कोणाला धडा शिकविण्याचाही प्रयत्न केलेला नाही. याची योग्य ती दखल आता जगाकडून घेतली जात आहे, असे वाटते. अमेरिकेने नुकतेच भारत, पाकिस्तान, चीन व अफगाणिस्तान या देशासंबंधीचे जे धोरण घोषित केले, त्यातून याचा प्रत्यय येतो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि विदेश व्यवहार मंत्री रेक्स टिलरसन यांनी अतिशय स्पष्टपणे भारताचे महत्त्व उच्चारले असून चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना थेट इशारा दिला आहे. इतकेच नव्हे, तर भारताचे सहकार्य त्यांनी अपेक्षिले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या संबंधात इतक्या स्पष्टपणे आणि उघडपणे आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन प्रशासनाने भारताची भलावण केलेली नाही. भारताशी दृढ अशा प्रकारचे संरक्षण आणि अर्थविषयक संबंध प्रस्थापित करू. हे संबंध केवळ तात्कालिक नसून शतकभरासाठीचे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही बाब भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी अनुकूल आहे, असे म्हणता येईल. सध्या या घडामोडी केवळ प्रस्तावस्वरूप असल्या तरी भारताने योग्य हालचाली त्वरेने केल्यास त्यांचे रूपांतर प्रत्यक्ष परिणामांमध्येदेखील दिसू शकेल. अमेरिकेच्या सहकार्याच्या प्रस्तावावर सकारात्मक आणि देशहितवादी दृष्टिकोनातून विचार अवश्य केला पाहिजे. एकेकाळी, अर्थात भारताच्या स्वातंत्र्यानंतर काही दशके अमेरिकेशी जवळीक भारताच्या तत्त्वज्ञानात बसत नव्हती. निदान उघडपणे तसे दाखवले जात नव्हते. त्यावेळी भारताच्या धोरणकर्त्यांना रशिया, चीन इत्यादी देशांनी आचरणात आणलेल्या साम्यवादी-समाजवादी राज्यपद्धतीचे जबर आकर्षण होते. साहजिकच अमेरिका वरकरणी तरी आपल्यासाठी निषिद्ध ठरली होती. यातही एक गंमतशीर विसंगती होती. शासनाचे आंतरराष्ट्रीय धोरण अलिप्तदावादी आणि डावीकडे झुकणारे असले तरी सर्वसामान्य जनता मात्र अमेरिकाप्रेमी होती. ज्याला संधी मिळेल तो अमेरिकेला पळत होता. कट्टर अमेरिकाविरोधी असणाऱया आणि नेहमी त्या देशाविरोधात वाक्ताडन करणाऱया नेत्यांची मुलेही अमेरिकेत स्थायिक झाल्याची उदाहरणे कमी नव्हती. याबद्दल विचारले असता तो मुलांचा वैयक्तिक प्रश्न आहे, आम्ही आमचे विचार त्यांच्यावर थोपवत नाही कारण आम्ही विचारस्वातंत्र्य मानणारे आहोत, अशी मखलाशी करून स्वतःची सुटका करून घेतली जात असे. पण त्या काळापासून आजपर्यंत आपण बरेच पुढे आलेलो आहोत. तेव्हा ‘ताकाला जाऊन भांडे लपविण्या’ची दांभिकता आता दाखविण्याचे कारण उरलेले नाही. भारताचे महत्त्व आता पाश्चिमात्य जगाने ओळखले असल्याचे जाणवते. त्याची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली असेल तर भारतानेही त्याला प्रतिसाद देण्यात त्याचे हित आहे. चालत आलेल्या या संधीची निदान सखोल तपासणी तरी करावी आणि देशाचे हित साधले जाईल, अशा प्रकारे व्यवहारी भूमिका घेण्याचा शहाणपणा दाखवावा. कधी विश्वशांती, कधी अलिप्ततावाद कधी भांडवलशाहीला विरोध तर कधी अखिल मानवतेचे कल्याण असल्या निरर्थक आणि बिनबुडाच्या तात्विक फाफटपसाऱयात न अडकता डोके शांत ठेवून तसेच पाय जमिनीवर ठेवून या नव्या वातावरणाशी जुळवून घेता आल्यास पहावे. जे देश पूर्वी आपल्या मागे होते, ते गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपल्या पुढे निघून गेले. याचे कारण त्यांनी संधी मिळताच हा शहाणपणा दाखवला, हेच आहे. आपण मात्र अनेकदा ही संधी गमावली. आतातरी तसे न करता धोरणसातत्य राखून नवा विचार येऊ देणे ही सर्व राजकीय पक्षांची जबाबदारी आहे.

 

Related posts: