|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मराठा बांधवांचा 23 रोजी मेळावा

मराठा बांधवांचा 23 रोजी मेळावा 

प्रतिनिधी / दोडामार्ग :

कोपर्डी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भर मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन मराठा समाजामार्फत करण्यात आले होते. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 23 ऑक्टोबर 2016 रोजी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोच्या संख्येने मराठा समाजाने मोर्चा काढलेला होता. मोर्चाला 23 तारखेला एक वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहवे, असे आवाहन मूक मोर्चाचे मुख्य संयोजक सुहास सावंत यांनी केले आहे.

या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून यावर्षी सिंधुदुर्ग मराठा समाजातर्फे संकल्प दिनाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. या निमित्ताने शरद कृषी भवन ओरोस येथे मराठा मेळावा व मराठा फाऊंडेशन, सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱयांचा पदग्रहण सोहळा व ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हय़ातील मराठा सरपंचाचा सत्कार अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग मराठा क्रांती मोर्चाचे घटनांबाबतचे वर्तमानपत्रातील बातम्या व छायाचित्र्यांचे प्रदर्शन सुद्धा मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गेले वर्षभर महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे मागण्यांबाबत काय केले? त्याचप्रमाणे मराठा समाजाची मागण्यांबाबतची पुढील धोरणे? याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आमदार राजन साळवी व आमदार नीतेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मराठा समाज बांधवानी बहुसंख्येने या मेळाव्याला उपस्थित राहवे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा सिंधुदुर्गतर्फे करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर नुकतीच दोडामार्ग तालुक्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पुढील रणनितीवर चर्चा करताना मोर्चा मागण्या सरकारकडून परिस्थितीत पूर्ण करुन घेण्याबाबत निश्चय करण्यात आला. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा मराठा क्रांती मूक मोर्चाचे मुख्य संयोजक ऍड. सुहास सावंत, तालुका संयोजक ऍड. सोनू गवस, सचिव उदय पास्ते, नगरसेवक दिवाकर गवस, प्रसाद पास्ते, विठ्ठल दळवी, सुहास देसाई, संगम घाडी, घाडी आदी उपस्थित होते.

Related posts: