|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ओटवणेत बँकेत चोरीचा प्रयत्न

ओटवणेत बँकेत चोरीचा प्रयत्न 

सेफरुमचे कुलुप तोडता न आल्याने चोरटय़ाचा डाव उधळला

वार्ताहर / ओटवणे :

बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेत चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. सुदैवाने बँकेतील सेफरुमचे कुलूप न तुटल्याने चोरटय़ांचा डाव उधळला गेला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेत बँक इमारतीच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरटय़ांनी आत प्रवेश केल्याचे उघड झाले. भरवस्तीतील या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे.

 ओटवणे येथील रवळनाथ मंदिरानजीक बँक ऑफ इंडियाची शाखा इमारत आहे. गेल्या दहा वर्षांपासून ही शाखा सुरू आहे. गुरुवारी व शुक्रवारी सुट्टी होती. शनिवारी सकाळी बँकेचे कर्मचारी सुधाकर बुराण यांनी कार्यालय उघडले असता त्यांना चोरीचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत बँकेचे मॅनेजर वरुणकुमार यांना माहिती दिली. त्यांनी बँकेत येऊन पाहणी केली असता आतील रुमचे कुलूप चोरटय़ांनी तोडल्याचे दिसून आले. मात्र, सेफरुमचे कुलूप चोरटय़ांना तोडता न आल्याने त्यांचा डाव उधळला गेला. बँकेतील कोणतीही वस्तू चोरीस न गेल्याचे वरुणकुमार यांनी सांगितले. याबाबत त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक विनायक नाईक, विलास नर, दीपक सुतार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बँकेत सीसीटीव्ही यंत्रणा आहे. मात्र अंधार असल्याने चोरटय़ांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. नंतर श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्वान बँकेपासून अर्धा किमीवरील नदीपर्यंत जाऊन घुटमळला. अधिक तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक अरुण जाधव करीत आहेत.

सायकल गायब

बँक ऑफ इंडियाच्या इमारतीचे मालक अर्जुन देवळी यांच्या नजीकच्या घरासमोरील सायकल मात्र गायब असून ती चोरटय़ांनी पळविली असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.