|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » धान्य व्यापाऱयास मारहाण, नव्वद हजारांची रोकड लुटली

धान्य व्यापाऱयास मारहाण, नव्वद हजारांची रोकड लुटली 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

साळोखेनगर येथे मंगळवारी रात्री धान्य व्यापारी संजय जीवनधर हुक्केरी (वय 56) यांना चौघांनी मारहाण केली. त्यांच्याकडे असलेली 90 हजारांची बॅग चोरटय़ांनी जबरदस्तीने काढून घेतली. हुक्केरींनी आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी नागरिक जमा झाले. तोपर्यत दोन मोटारसायकलींवरून संशयित चौघे पळून गेले. बुधवारी या चोरीची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

साळोखेनगर येथील शिवशक्ती हायस्कूलनजिक प्लॉट क्र. 86 मध्ये संजय जीवनधर हुक्केरी राहतात. लक्ष्मीपुरी धान्य बाजारात त्यांचे श्रीवर्धन ट्रेडर्स हे धान्याचे होलसेल विक्रीचे दुकान आहे. ते कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष आहेत. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत. मंगळवारी रात्री त्यांनी लक्ष्मीपुरीतील आपले दुकान बंद केले. रात्री दहाच्या सुमारास ते ऍक्टिव्हा दुचाकी (एमएच 09 एआर 5779) वरून घरी निघाले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीच्या डिकीत दिवसभरात झालेल्या व्यापाराचे 87 हजार रुपये, मोबाईल, लॉकरच्या चाव्या, अन्य कागदपत्रे असलेली बॅग ठेवली होती.

संजय हुक्केरी हे शिवशक्ती हायस्कूलनजीक आले असता रात्री सव्वादहाच्या सुमारास पाठलाग करत आलेल्या दोन मोटारसायकलपैकी एका मोटारसायकलस्वाराने त्यांच्या ऍक्टिव्हा दुचाकीला लाथ मारली. त्यामुळे ऍक्टिव्हावरून हुक्केरी खाली पडले. हुक्केरी यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयितांनी स्प्लेंडर मोटारसायकली बाजूला लावल्या. मोटारसायकलीवरील चौघांनी व्यापारी हुक्केरींचा पाठलाग सुरू केला. ते सापडल्यानंतर चौघांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या दुचाकीच्या डिकीतील 87 हजार रुपयांची रोकड असलेली बॅग जबरदस्तीने काढून घेतली.

चौघांच्या मारहाणीमुळे हुक्केरी यांच्या ओरडण्याने नागरिक जमा झाले. त्यामुळे मारहाण करणाऱयांनी तेथून बॅग घेऊन पळ काढला. नागरिकांनी संशयितांचा पाठलाग केला. पण आणलेल्या मोटारसायकलींवरून संशयित चौघांनी पळ काढला. या चोरीची नोंद बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात झाली आहे.

  संशयितापैकी दोघेजण 25 ते 30 वयोगटातील होते. त्यांची उंची पाच ते सहा फुट होती. त्यांनी फिक्कट चॉकलेटी टी शर्ट आणि राखाडी पॅट परिधान केल्या होत्या. दुसऱया मोटारसायकलवरील संशयित दोघे 20 ते 25 वयोगटातील होते. त्यांनी चेक्सचा निळा शर्ट, निळय़ा जिन्स परीधान केल्या होत्या. पोलिसांनी पहाटेपर्यत नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेतला, पण ते मिळून आले नाहीत.  जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दराडे तपास करत आहेत.

फिर्यादी मध्यरात्रीपर्यत पोलीस ठाण्यातच

संशयितांनी केलेल्या मारहाणीनंतर फिर्याद देण्यासाठी जखमी स्थितीत पोलीस ठाण्यात आलेल्या व्यापारी हुक्केरी यांना पोलिसांनी मध्यरात्रीपर्यत ताटकळत ठेवले.  त्यानंतर त्यांची फिर्याद घेण्यात आली. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले नाही. गेली तीन दिवस त्यांनी खासगी रूग्णालयांत उपचार घेतले. पोलिसांच्या या दिरंगाईसंदर्भात व्यापारी असोशिएशन सोमवारी, 23 रोजी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली.

Related posts: