|Friday, October 19, 2018
You are here: Home » मनोरंजन » ईफ्फीमध्ये झळकणार दशक्रिया

ईफ्फीमध्ये झळकणार दशक्रिया 

राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या रंगनील क्रिएशन्स निर्मित दशक्रिया चित्रपटाची येत्या 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोवा राज्यात होणाऱया 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (ईफ्फी) मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारच्यावतीने निवडण्यात आलेल्या सहा मराठी चित्रपटांमध्ये निवड झाली असून दशक्रियाच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. गोव्यातील रसिक-प्रेक्षकांसोबतच भारतातील आणि जगभरातील विविध जाणकार, समीक्षकांच्या पसंतीची दाद अनुभवता येणार आहे. हा चित्रपट येत्या 17 नोव्हेंबर 2017 रोजी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

रंगनील क्रिएशन्स निर्मित दशक्रिया चित्रपटाला 64 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट (निर्मिती-दिग्दर्शन), सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अशा चार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एका अत्यंत वेगळय़ा विषयाची निवड करून पदार्पणातच दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांनी चार राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवली आहे. सर्वसामान्य माणसांच्या जगण्यातल्या वास्तवतेच्या मुळाशी जाऊन त्यातील मर्म जाणणारे प्रतिभावंत लेखक-गीतकार-कवी म्हणून संजय कृष्णाजी पाटील यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. बाबा भांड यांच्या प्रचंड गाजलेल्या दशक्रिया या कादंबरीवर सूक्ष्म निरीक्षणासोबतच अभ्यासपूर्ण लिहिलेल्या पटकथेमुळे त्यांना दशक्रिया चित्रपटाने पहिले सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देऊन त्यांच्या प्रतिभेचा यथोचित सन्मान केला आहे. दशक्रियासारख्या अत्यंत संवेदनशील विषयासाठी मोठय़ा धैर्याने आणि उत्साहाने पाठीशी उभे राहून आर्थिक पाठबळ देणाऱया कल्पना कोठारी यांच्या रंगनील क्रिएशन्स नेही निर्मितीतले सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पुस्कारर पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या चित्रपटासाठी 51 वर्षानंतर पहिल्यांदाच अभिनेते मनोज जोशी यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे.

प्रतिभावंत ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश अणे यांनी दशक्रियाचा बॅकड्रॉप जिवंत केला असून त्यांच्या सिनेमॅटोग्राफीने दशक्रियाच्या भव्यतेत अधिक भर पडली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, आशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर यांच्यासोबतच जवळपास दीडशेहून अधिक सन्माननीय कलावंत आणि तितक्याच कुशल तंत्रज्ञांनी साथ आणि योगदान देऊन दशक्रियाला एक उंची दिली आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन 2015 पासून एनएफडीसीच्या फिल्मबाजारमध्ये मराठी चित्रपट महाराष्ट्र राज्य सरकारतर्पे पाठविण्यात येत आहे. या महोत्सवात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निर्माते, दिग्दर्शक, समीक्षकांनी तसेच चित्रपट रसिकांच्या उपस्थितीमुळे मराठी चित्रपटाला जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे.

Related posts: