|Thursday, October 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राजपुत्राचा राज्याभिषेक लवकरच

राजपुत्राचा राज्याभिषेक लवकरच 

राहुल गांधी लवकरच काँगेस अध्यक्ष होतील याचे सूतोवाच साक्षात सोनिया गांधीनी केल्याने घराणेशाहीची परंपरा राखत देशातील सर्वात जुना पक्ष आता परत एक नवीन डाव खेळत आहे. तीन वर्षांपूर्वी ज्याला ‘पडेल’ नेता म्हणून हिणवले गेले त्याला आता घोडय़ावर बसवण्याचे काम सुरू आहे. आता ते पक्षाची सूत्रे औपचारिकरित्या केव्हा घेतात याचेच फक्त रहस्य उरले आहे.

 

राहुल गांधी लवकरच काँगेस अध्यक्ष होतील याचे सूतोवाच साक्षात सोनिया गांधीनी केल्याने आता ते पक्षाची सूत्रे औपचारिकरित्या केव्हा घेतात याचेच फक्त रहस्य उरले आहे. या महिनाअखरेपर्यंत काँगेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राहुल यांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा केव्हा होणार ती होवो पण अनौपचारिकरित्या त्यांनी ही जबाबदारी केव्हाच पार पाडावयास सुरुवात केली आहे. सोनिया गांधी केवळ तोंडदेखल्या ‘रिटायरमेंट मोड’ला गेलेल्या नाहीत. त्यांनी दहा जनपथमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना भेटण्यास केव्हाच मनाई केली आहे आणि त्यामुळे आता त्यांचे निवासस्थान भग्न झालेले आहे. ‘ज्याला कोणाला पक्षकामाबाबत भेटायचे असेल त्याने राहुलजींना भेटले पाहिजे’ असे दहा जनपथाचा स्टाफ सोनियांना भेटण्याला इच्छुक पक्ष कार्यकर्त्यांना सांगत असतो. कडू-गोड वातावरणात सोनिया 19 वर्षे बाळगलेला काँगेस अध्यक्षपदाचा मुकुट आपल्या मुलाला देत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँगेसला अवघ्या 44 जागा मिळाल्यापासून सोनियांना एक जबर धक्का बसलेला आहे. काँगेसच्या 125 वर्षांपेक्षांच्या जास्त लांब इतिसासात 2014 चा दारुण पराभव आपल्या खात्यावर लिहिला जाणार या कल्पनेने त्या व्यथित आहेत. पक्षाला चांगले दिवस दिसू लागले असताना राहुल ही जबाबदारी स्वीकारत आहेत याबाबत त्या खुष आहेत. आपल्यानंतर आपल्या मुलालाच आपली गादी मिळावी यासाठी त्यांनी इतकी वर्षे राजकारण केले. मोदी लाट विरत चाललेली असताना त्याचा सर्वात जास्त फायदा काँगेसला होईल असा समज असताना राहुलचा राज्याभिषेक होत आहे ही सर्वात जास्त जमेची बाजू आहे. कालपरवापर्यंत ‘अजेय’ अशी प्रतिमा असलेले पंतप्रधान आता दिवसेंदिवस केविलवाणे दिसू लागले असताना काँगेसमध्ये हा नेतृत्त्व बदल होत आहे. निवडणुकीत दिलेल्या भरमसाठ आश्वासनांची पूर्तता होण्याचे दूरच पण ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी सामान्य माणसाची अवस्था होत असल्याने जनता जनार्दनात संताप वाढत आहे. भाजपचा खासमखास व्यापारी वर्गच नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उलटल्याने ‘एक ही भूल, कमल का फूल’ अशी सत्ताधारी पक्षाविरुद्ध मोहीम सुरू झाली आहे. ‘कोणीही यावे टपली मारून जावे’, अशी अवस्था भाजप नेतृत्वाची झालेली आहे. यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारख्या ‘घरचा अहेर’ देणाऱया मंडळींची संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. 56 इंच छातीची शेखी मिरवणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा ‘बुलेट टेन’ होते आता त्यांची अवस्था ‘पॅसेंजर’ प्रमाणे झाली आहे. मोदी किमान दहा वर्षे पंतप्रधान राहतील अशी अपेक्षा केली जात होती तर प्रत्यक्षात तिसऱया वर्षातच त्यांची दमछाक सुरू झाली आहे. या अशा पार्श्वभूमीवरच काँगेसमध्ये नेतृत्त्व बदलाची हालचाल सुरू झाली आहे हे लक्षणीय मानावे लागेल. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राहुल यांची न भूतो न भविष्यती प्रकारे निर्भर्त्सना करून, टर उडवून, मोदी आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांना आता नेता बनवले आहे. कालपर्यंत ज्याला ‘पप्पू’ म्हणून हिणवले तो आता राजकारणातला बाप माणूस होऊ लागला आहे. गेल्या 3-4 वर्षातील संघर्षामुळे एका गुलछबू राजपुत्राचे रूपांतर एका जाणत्या नेत्यात होऊ लागले आहे. मोदी-शहा यांच्या गुजरातध्येच राहुलना जो प्रतिसाद मिळू लागला आहे त्याने केवळ भाजपाईच नव्हे पण काँगेसीदेखील तोंडात बोटे घालत आहेत. ‘गुजरातमधील येती विधानसभा निवडणूक सोपी नाही कारण नेत्याचे उद्गार बोलके आहेत. गुजरातमधील हवा बदलू लागली आहे. पण तेथे धार्मिक उन्मादाचे वातावरण निर्माण करायला वेळ लागणार नाही या भीतीने काँगेसला ग्रासले आहे. राहुल आणि त्यांच्या टीमने गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. कारण गुजरातची निवडणूक ही राष्ट्रीय महत्त्वाची मानली जाते. गुजरातध्ये भाजप जरी काठावर पास झाला तरी तो सत्ताधारी पक्षाचा पराभव मानला जाईल व त्याचे परिणाम राष्ट्रीय स्तरावर मोदी-शहांना भोगावे लागतील. गुजरातमध्ये काँगेसने बऱयापैकी कामगिरी केली की राहुलना त्याचे श्रेय देऊन त्यांच्या नेतृत्त्वाची टिमकी वाजवण्याचा जोरदार प्रकार सुरू होईल. हुजरेगिरीमध्ये काँगेसींचा हात धरणारा कोणी नाही.

नुकत्याच झालेल्या गुरुदासपूर लोकसभा पोटनिवडणुकीत काँगेसचे सुनील जाखर यांनी भाजप उमेदवाराचा जवळ जवळ दोन लाख मतानी केलेला पराभव म्हणजे बदललेल्या वातावरणाचे संकेत आहेत असे दावे होत आहेत. गुजरातच्या निवडणुकीपूर्वी हा काँग्रेसला खचितच शुभसंदेश होय. 2017 साली झालेल्या लोकसभेच्या सहा पोटनिवडणुकींपैकी अमृतसर, मल्लापुरम, श्रीनगर आणि गुरुदासपूर या चार जागा काँगेस अथवा त्याच्या मित्रपक्षांनी जिंकल्या आहेत हे वास्तव आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँगेसचे पानिपत होणार आहे अशी भाकिते केवळ भाजपाई करत नसून काँगेसीदेखील करत आहेत, म्हणूनच विरोधी पक्षांची सारी मदार गांधीनगरच्या लढाईवर आहे.

राहुल गांधीना एक यशस्वी नेता व्हायचे असेल तर त्यांनी खूप बदलण्याची गरज आहे. ते कितपत पोहून जाऊ शकतात यावर त्यांचे यश अवलंबून आहे. काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक धाग मंडळी असल्याने ती स्वतःसाठी सुरुंग लावण्यास पाठीमागे मागेपुढे पाहणार नाहीत याचे भान राहुलना जितके लवकर होईल तितके चांगले. राहुलना हे आव्हान सोपे नाही कारण एकीकडे सरकार म्हणजे ‘सब कुछ मोदी’ आहे तर संघटनेत अमित शहांच्या संमतीशिवाय पानही हलत नाही. मोदी-शहा हे दोघे अतिशय कष्ट घेणारे नेते आहेत आणि राजकारणातील छक्के-पंजे त्यांच्यासारखे कोणालाच माहीत नाही अशा वेळी राहुल यांनी मान मोडून जर संघटनेची बांधणी केली, जे÷ांना चुचकारत नवीन रत्नांना वाव दिला आणि स्वयंरोजगार, स्वास्थ्य, भावी शिक्षण यावर आधारित महत्त्वाकांक्षी कार्यक्रम दिला तरच त्यांना यश संभवते. राहुलना मुकुट मिळणार खरा, पण तो काटेरी असणार आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर’ अशा प्रॅक्टीकल प्रकाराचे काँगेसी असल्याने राहुलनी त्वरित चांगली कामगिरी दाखवली तरच त्यांचे नेतृत्त्व टिकेल हे सांगायला कोणा कुडमुडय़ा ज्योतिषाची गरज नाही. सद्या मात्र मोदी-शहांच्या चुकांचा चांगलाच राजकीय लाभ मिळण्याचे त्यांचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. ‘काँगेस मुक्त भारत’ची घोषणा करणाऱयांना आता आपलेच घोडे आवरता येत नाहीत असे वाटत आहे. देशातील राजकारण बदलत आहे तर काँगेस एका निर्णायक वळणावर आली आहे. घराणेशाहीची परंपरा राखत देशातील सर्वात जुना पक्ष आता परत एक नवीन डाव खेळत आहे. तीन वर्षांपूर्वी ज्याला ‘पडेल’ नेता म्हणून हिणवले गेले त्याला आता घोडय़ावर बसवण्याचे काम सुरू आहे.

Related posts: