|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हें घटिकायंत्र जैसें

हें घटिकायंत्र जैसें 

भगवान अर्जुनाला सृष्टीक्रमाची अपरिहार्यता  समजावून सांगत आहेत – अर्जुना! मी तुला सांगितलेलं समजलं का? उत्पन्न होणे आणि नाश पावणे, हा सृष्टीक्रम पाहून तुला उद्वेग आला असला तरी हा जन्ममृत्यू अपरिहर आहे. हा कोणालाही चुकवता येणार नाही. मग तू वृथा शोक का करावास? गंगेच पाणी येतं, राहतं व जातं. सूर्य उगवतो, राहतो व मावळतो. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे नियमितपणे येतात, राहतात व जातात. उत्पत्ति, स्थिती आणि लय हा सृष्टीचा क्रम आहे. हा प्रकृतिचा स्वभाव आहे. पाणी उताराकडेच वाहतं आणि तसंच ते वाहत राहणार. ह्या सृष्टीनियमात बदल होणार नाही. बुद्धीबळाच्या डावातील उंट हा तिरकाच जायचा, हत्ती हा सरळच जायचा तर घोडा अडीच घरच चालायचा. जन्ममृत्यू हा सृष्टीचा स्वभाव आहे. ह्या प्रक्रियेतून सृष्टी नित्यनूतन होत असते. हाच धर्म आहे. मृत्यू ही सृष्टीच्या नूतनीकरणाची एक प्रक्रिया आहे, म्हणून जन्ममृत्यू अपरिहर आहेत. ते टाळता येत नाहीत, चुकवता येणार नाहीत. मग त्यासाठी शोक करणं शहाणपणाचं ठरेल का?

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ।

ना तरी उदो अस्तु आपैसें ।

अखंडित होत जात जैसें ।

हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ।

अर्जुना! जे निर्माण होत ते नक्की नाश पावतं आणि जे नाश पावतं ते परत निर्माण होतं. हा असा सृष्टीक्रम अखंड चालू आहे. घटीकायंत्राच्या परिभ्रमणाप्रमाणे येणं, जाणं व परत येणं हा क्रम चालूच राहणार. घटिकायंत्र हे एक विशेष प्रकारचं भांडं असतं. त्याचे दोन भाग असतात. त्याच्या वरच्या भागात वाळू असते. ती वाळू मधल्या भोकातून खालच्या भागात हळूहळू पडत असते. एक घटका म्हणजे चोवीस मिनिटे. एका घटकेनं वरचा भाग रिकामी होतो व खालचा भाग वाळूने भरतो. मग ते भांड उलटं करून ठेवायचं असतं. परत वरचा भाग हळूहळू रिकामा होतो व खालचा भाग भरतो. लगेच ते परत उलट करून ठेवायचं. अशा तऱहेनं, पूर्वी आजच्यासारखी घडय़ाळे नव्हती तेव्हा कालमापन करीत असत. असं भांडय़ाचं उलट सुलट होणं सतत चालू असे. आजकालच्या घडय़ाळाचे काटे जसे वर्तुळाकार सतत फिरत राहतात तसेच हे! भगवान म्हणतात – अर्जुना! ह्या घटिकायंत्राप्रमाणे जन्माला येणं, मग मरणं व परत जन्माला येणं हा सृष्टीक्रम अव्याहत चाललेला असतो. जीवनाच्या या अखंड प्रवाहात नाना जीव येत असतात व जातात. ही एक प्रकृति यंत्र अशी घटना आहे. ती आपल्या स्वाधीनची अशी घटना नाही. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही सहज आहे, विनासायास आहे.

महाप्रळयावसरें । हें त्रैलोक्मयहि संहरे ।

म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ।

तूं जरी हें ऐसें मानिसी ।

तरी खेदु कां करिसी ? ।

काय जाणतुचि नेणसी । धनुर्धरा ।

– ऍड. देवदत्त परुळेकर

Related posts: