|Monday, October 22, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » निरागस नागजंपी

निरागस नागजंपी 

मुकेशच्या आवाजातलं एक जुनं गाणं आहे “एक वो भी दीवाली थी, एक यह भी दीवाली है…’’

गाण्यातल्या वर्णनानुसार आधीच्या दिवाळीत त्याला नायिकेच्या प्रेमाचं सुख लाभलेलं होतं आणि यंदाच्या दिवाळीत त्याला ती सोडून गेल्यामुळे तो दु:खी वगैरे आहे. असू देत.

मुकेशचं गाणं आठवलं ते नागजंपीमुळे. परवा दिवाळी संपली आणि रविवारी सकाळी आम्ही नेहमीच्या उडप्याकडे गेलो. डोसा मागवल्यानंतर नाग्याने आपला निरागस सवाल फेकला,

“ते आपलं मोठं मोठं पुढारी लोक मधी म्हणत होतं की देशातलं सगळं निवडणूक एकाच वेळी घेतलं पायजे. म्हणजे ग्रामपंचायत, झेडपी, मुन्शिपाल्टी, विधानसभा, लोकसभा वगैरे.’’

“हो म्हणजे मग देशाचा खर्च वाचेल आणि त्यात आपला पण फायदा आहे. सध्या बघ, पाच वर्षात तीन निवडणुका येतात – मनपा, विधानसभा, लोकसभा. प्रत्येक वेळी उमेदवार शहरभर फ्लेक्स लावून घाण करतात. स्पीकरवर भाषणांच्या भंगार सीडी लावतात. प्रचार फेरीसाठी आणि सभेत गर्दी करण्यासाठी पैसे देऊन माणसं गोळा करतात. आमची सखुबाई निवडणुकीच्या मोसमात महिना-दीड महिना दांडी मारते. प्रत्येक पक्षाच्या प्रचारफेरीत आणि सभेला जाते आणि दाबून कॅश, नव्या कोऱया साडय़ा आणि नवऱयासाठी खंबे मिळवते… त्या काळात तिची आणि तिच्या नवऱयाची चैन असते. पण आमचे खूप हाल होतात. सगळय़ा निवडणुका एकदम झाल्या तर पाच वर्षातून एकदाच हा त्रास होईल. काय?’’

“सखुबाई मरू देत. तुझं मागचं आणि यंदाचं दिवाळी कसं गेलं?’’

“दिवाळी काय, दिवाळीसारखीच गेली.’’

“पण त्याच्या आधीच्या दोन तीन दिवाळीचं आठवण करून बघ. लागोपाठ निवडणूक आलं. प्रत्येक दिवाळीत वेगवेगळय़ा पार्टीचं पुढारी लोक घरी येऊन मिठाईचं बॉक्स, फटाके, मोती साबण देत होतं. कोणी सोसायटीच्या भिंतीला रंग देत होतं. कोणी चौकात होम मिनिस्टरचं खेळ करून गल्लीतल्या प्रत्येक वहिनीला गिफ्ट देत होतं. पुढाऱयांचं तालेवार बायका पण हळदीकुंकूचं निमित्त करून वॉर्डातल्या लेडीजना गिफ्ट वाटत होतं. यंदा निवडणूक नाय तर सगळं पुढारी गायब. म्हणून मी म्हणतंय. सगळं निवडणूक एकदम नको. दर वषी एक तरी निवडणूक पाहिजे. म्हणजे प्रत्येक दिवाळी कसं मस्त जातंय.’’

वेटरने डोसा आणला आणि आमची चर्चा तिथेच थांबली.

Related posts: