|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शरद पवारांचा ऐतिहासिक सत्कार झाला पाहिजे

शरद पवारांचा ऐतिहासिक सत्कार झाला पाहिजे 

रामराजे यांचे स्पष्ट निर्देश,शशिकांत शिंदे यांनी गैरहजर पदाधिकारी व कार्यकर्त्याचे कान उपटले

प्रतिनिधी/ सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा जिल्हा हा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्याला साजेसा ऐतिहासिक असाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सत्कार झाला पाहिजे. सर्व पक्षीय हा कार्यक्रम साताऱयात हेणार आहे. पवार साहेबांचा दिल्लीत, मुंबईत सत्कार झाले. त्यापेक्षाही चांगला सत्कार त्यांच्या साताऱयात झाला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक -निंबाळकर यांनी दिले.दरम्यान, राज्याचे प्रभारी प्रवक्ते आमदार शशिकांत शिंदे यांनी मात्र बैठकीला गैरहजर राहणारे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांवर टीकेची झोड उठवत कान उपटले.

राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱयांची खासदार शरद पवार यांच्या संसदिय कार्याला 50 वर्ष झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्काराच्या नियोजनासाठी बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक -निंबाळकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, माण-खटावची जबाबदारी मी घेतो. तेथील कार्यकर्ते जोमाने काम करतील. कार्यक्रमाला जास्तीत जास्त कार्यकर्ते येतील. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला सातारा जिल्हा आहे. त्याला साजेसा सत्कार शरद पवारसाहेबांचा झाला पाहिजे. आतापर्यंत दिल्लीत, मुंबईत त्यांचे सत्कारसोहळे झाले. त्यापेक्षाही सातारा जिह्यातील न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम झाला पाहिजे. स्वागत समिती तयार करण्यात येवून खास निमंत्रण म्हणून सिक्कीमचे राज्यपाल सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना द्या. त्यांना बोलवण्याची जबाबदारी ही बाळासाहेबांवर राहील. बाळासाहेबांनी मनावर घेतलं तर मोदींनाही साताऱयात आणतील, अशा शब्दात आमदार बाळासाहेब पाटील यांचा चिमटा काढला.

आमदार शिंदे यांनी उपटले कान

पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचे आणि पक्षाचे कार्य करायचे नाही. बैठकीला गैरहजर राहण्याचे असेल तर असे कार्यकर्त्यांबाबत निर्णय घेण्यासाठी एक स्वतंत्र बैठक लावावी लागेल. एकही जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकेचे नगरसेवक जर हजर राहत नसतील तर विकास कामे देतानाही विचार करावा लागेल. पद अडवून पक्षाचे नुकसान करणाऱयांबाबत पक्ष निर्णय घेईल. पद हे लिमिटेड नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे. येत्या दीड वर्षात जिह्यात संघर्ष करायचा आहे. फलटण, कराड उत्तर, वाई, कोरेगाव या मतदार संघातील कार्यकर्ते दिसतात. माण-खटावचे कार्यकर्ते दिसत नाहीत. सातारा तालुक्याचे प्रतिनिधी आहेत कुठे?, नासिर भाई एकटेच दिसतात. पाटणचे संजय देसाई एकटेच. प्रत्येक बैठकीला आता नोंदवही ठेवण्यात येणार आहे. जे कार्यकर्ते व पदाधिकारी गैरहजर राहतील, त्यांच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशा शब्दात कानपिचक्या देत, राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानात सातारा जिल्हा नंबर वन करायचा आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघाला पुस्तके दिली आहेत, असे सांगत, माजी उपमुख्यमंत्री अजितदादांनी विनंती केल्यानुसार सातारा जिह्यात शरद पवारसाहेबांचा सत्कार घ्यायचा आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर तब्बल 1 लाख लोक या सोहळयासाठी हजर राहिले पाहिजेत. प्रत्येक तालुक्याच्या आमदारांनी ही जबाबदारी घ्यावयची आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार बाळासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील, सुधीर धुमाळ, पंचायत समितीचे सदस्य राहुल शिंदे, जिल्हा परिषदेचे सदस्य मंगेश धुमाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: