|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » भाज्या कडाडल्या, दर आभाळाला भिडले

भाज्या कडाडल्या, दर आभाळाला भिडले 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हयामध्ये मागील काही दिवसात परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातल्याने बळीराजा सुखावला असला तरी काही पिकांना यांचा फटकाही बसला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट झाली आहे. भाज्याचे दर कडाडल्याने ज्या घरात भाज्यांचा ढीग दिसत होता आता तो कुठेतरी कमी झाला आहे. कांद्याने चाळीशी गाठल्याने गृहिणीच्या डोळयात पाणी आले असून वांगी, फ्लॉवर, कोबी,आले, कारले, तोंडली, गवार, पावटा, यांच्या दराने शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांच्या किचनमधून या भाज्या सध्या तरी गायब होत आहेत. आठ दिवसांपासून भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्यामुळे जेवणाच्या ताटात भाज्याच्या पंगत गायब झाली असून त्याची जागा आता कडधान्य आणि मांसाहाराने घेतली आहे. मागील काही दिवसात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने मेथी, कोथिबीर, पालक, चाकवत, याचबरोबर वांगी, टोमँटो, भेंडी, गवार, पावटा, दोडका, हिरवी मिरची इत्यादी भाजीपालाची पिके भुईसपाट झाल्याने आवक घटली आहे. तसेच किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच सणासुदीचे दिवस असल्याने शाकाहाराला प्राधान्य दिले जात असल्याने भाज्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आहारात भाज्या दुरापास्त झाल्या आहेत. हॉटेलमध्ये देखील मेथीच्या भाजी ऐवजी मेथीचं पिठलं येवू लागलं आहे. भाज्यांचे दर ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच चढे राहिले आहेत. मागील आठवडयापासून ते स्थिर असून कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. सर्व भाज्यांचे किलोचे दर याप्रमाणे कारले 40 ते 60 रू किलो, गवार 100 ते 120 रू, भेंडी 80 ते 100 रू, तोंडली, 80 ते 100 रू किलो, आहेत. पावटा 120 रू किलो, दोडका 80 रूपये किलो, फ्लॉवर 120 रू किलो, कोबी 80 रूपये किलो दराने विक्री होत आहेत. सर्वसामान्यांची सकाळ कांदा पोहयाने होत असून कांद्याने चाळीशी गाठल्याने पोहयामध्ये कांदा घालताना विचार  कारावा लागत आहे. कोथिबीरी छोटी जुडी 15 रूपयांना झाल्यामुळे मसाल्यातून तिला वगळले जात आहे.

 

 

 

 

 

Related posts: